"निलम गोऱ्हेंना उपसभापतीच्या खुर्चीवर बसता येणार नाही'' - अंबादास दानवे
X
महाविकास आघाडी सरकार असताना एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जात स्थापन झालेलं सरकार हा जवळपास एक वर्षाचा कालावधी. या एक वर्षांच्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरे गटाला अनेक झटके बसले आहेत. दिवसेंदिवस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढत गेली. आता एका वर्षानंतर देखील शिंदे यांच्या शिवसेनेत सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढते आहे. मागच्याच काही दिवसांपूर्वी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काहीच दिवसात विधान परिषदेच्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची सुद्धा बातमी समोर आली. आणि एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला. खरंतर एक वर्ष या दोन्ही नेत्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची बाजू भक्कमपणे सांभाळली होती. शिवसेनेच्या महिला आघाडीला भक्कम करण्याचं काम त्या करत होत्या. पण त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांची साथ सोडली आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला.
यानंतर आता ठाकरे गटाकडून त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे. पक्षविरोधी भूमिका घेतल्याने ठाकरे गटाने अपात्रतेची मागणी विधीमंडळ सचिवांकडे केली आहे. विधीमंडळ सचिव जितेंद्र भोळेंकडे ही नोटीस देण्यात आली आहे. हे तिघेही आमदार विधान परिषदेचे असून, शिंदे गटासोबत केल्यानं त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी अशी मागणी पत्रातून करण्यात आली आहे.
निलम गोऱ्हेंना उपसभापतीच्या खुर्चीवर बसता येणार नाही'' अंबादास दानवे नक्की काय म्हणाले?
"विधानसभेच्या सभापती निलम गोऱ्हे यांनी पक्षांतर केल्याच्या बातम्या आम्ही पाहिल्या. त्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विधानपरिषदेवर पाठवलेल्या प्रतिनिधी आहेत. म्हणून आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने निलम गोऱ्हे यांच्याबाबत अपात्रतेची नोटीस देण्यात आली आहे. नैतिकदृष्ट्या निलम गोऱ्हे यांना विधानपरिषदेच्या उपसभापतीच्या खुर्चीवर बसता येणार नाही. या विरोधात आम्ही आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. पण उपसभापती आणि सरकारने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला," असे अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.