कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवेल; शालिनी ठाकरेंचा भास्कर जाधवांना इशारा
आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांसमोरच एका महिलेल्या केलेल्या दमदाटीमुळे आता राजकीय वातावरण चांगलच तापलं असून, कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवेल असं मनसेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी आ. भास्कर जाधव यांना म्हटलं आहे.
X
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चिपळूण दौऱ्यादरम्यान शिवसेनेचे स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी एका महिलेला मुख्यमंत्र्यांसमोरच केलेल्या दमदाटीमुळे आता राजकीय वातावरण चांगलच तापलं असून , याबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहे. भास्कर जाधव यांच्या दमदाटीवरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आणि विशेष करुन शिवसेनेला चांगलच धारेवर धरलं आहे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शालिनी ठाकरे यांनी 'कोकणी माणूस भास्कर जाधवांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही' असं म्हटलं आहे.
अतिवृष्टीमुळे कोकणवासियांना सर्वाधिक फटका बसला आहे. चिपळूण येथे पुराचं पाणी ओसरल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थानिक जनता आणि व्यापाऱ्यांची भेट घेतली. दरम्यान महापूरामुळे घरांचे आणि व्यवसायाचे मोठे नुकसान झाल्याने चिपळूणमधील एक महिला आपली व्यथा मांडली या महिलेला अश्रू अनावर झाले, दरम्यान यावेळी ही महिला आपली व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडत होती. त्याचवेळी भास्कर जाधव यांनी तिला दमदाटी केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर याप्रकरणावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसल्या आहे.
यावरून मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवरुन भास्कर जाधावांना इशारा दिला आहे. "भास्कर जाधव, आज त्या अगतिक महिलेवर जो हात उघारलाय ना…? तोच हात पुढच्या पाच वर्षांनी जोडून जेव्हा मतं मागायला याल, तेव्हा हाच कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही," असं शालिनी ठाकरे म्हणाल्या आहेत.
राज्यात काही भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे तेथील नागरिकांवर संकटाचा डोंगर कोसळला आहे, अशावेळी या लोकांना धीर देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी चिपळूण आणि खेड मधील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. मात्र मुख्यमंत्र्यांसोबत असलेले विधानसभा तालिका अध्यक्ष आणि आमदार भास्कर जाधव यांच्या आरेरावीमुळे लोकांमध्ये संताप पाहायला मिळत आहे.