ममता बॅनर्जी विरोधी पक्षाचा चेहरा? ममता बॅनर्जी म्हणाल्या...
X
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. संसदेच पावसाळी अधिवेशन सुरु असताना ममता बॅनर्जी दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. ममता यांनी त्यांच्या दिल्ली दौऱ्यात कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांच्यासह अभिषेक मनू सिंघवी आणि आनंद शर्मा यांची देखील भेट घेतली. आज त्या अरविंद केजरीवाल यांची देखील भेट घेणार आहेत. तसंच त्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची देखील भेट घेणार आहेत.
ममता यांच्या या भेटीगाठीवर दिल्लीत चांगली चर्चा सुरु आहे. आज माध्यमांशी बोलताना ममता यांना प्रसारमाध्यमांनी त्या विरोधी पक्षाचा चेहरा असतील का? असा सवाल केला असता त्यांनी
"मी राजकीय भविष्यवाणी करणारी व्यक्ती नाही. हे सर्व ज्या त्या वेळच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. सिस्टीम आणि पद्धतीवर अवलंबून असेल. राजकीय पक्ष एकत्रितपणे कसं काम करतात, त्यावर अवलंबून आहे. त्यातून नेतृत्व पुढे येईल. कुणीही नेतृत्व केलं तरी मला अडचण नाही. आम्ही त्याला पाठिंबा देऊ" असं मत ममता यांनी व्यक्त केलं आहे. मात्र, देशात मोदी विरोधात आघाडी तयार करण्याचं काम प्रशांत किशोर करत असल्याचं समजतंय. त्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांचा दिल्ली दौऱा महत्त्वाचा मानला जात आहे.