Home > Political > प्रकरणाची शहानिशा करून पोलिसांना कारवाईचे निर्देश - रुपाली चाकणकर

प्रकरणाची शहानिशा करून पोलिसांना कारवाईचे निर्देश - रुपाली चाकणकर

प्रकरणाची शहानिशा करून पोलिसांना कारवाईचे निर्देश - रुपाली चाकणकर
X

अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आमदार सुरेश धस यांच्याविरोधात केलेल्या तक्रारीवरून महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने सोमवारी मुंबई पोलिसांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. धस यांच्या अयोग्य आणि बदनामीकारक वक्तव्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनावर परिणाम झाला, अशी तक्रार प्राजक्ता यांनी महिला आयोगाकडे दाखल केली आहे. आयोगाने या प्रकरणी पोलिसांकडून वस्तुस्थितीदर्शक अहवालही मागवला आहे.

प्राजक्ता माळी वाद काय आहे?

बीड सरपंच हत्येप्रकरणी राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य करण्याच्या प्रयत्नात भाजप आमदार सुरेश धस यांनी त्या प्रकरणात अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचे नाव ओढल्याबद्दल प्राजक्ता यांनी त्यांची माफी मागावी अशी मागणी पत्रकार परिषदेत केली होती. त्यांनी रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली. महिलांचा अपमान करणारे कोणतेही कृत्य खपवून घेतले जाणार नाही व योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन देवेंद्र फडणवी यांनी प्राजक्ता माळी व त्यांच्या कुटुंबीयांना दिले आहे.

प्राजक्ता माळी यांची तक्रार काय?

महिलांना, विशेषतः अभिनेत्यांना सॉफ्ट टार्गेट बनवता कामा नये, असे सांगून धस यांच्या टिप्पण्या वाईट आणि निराधार असल्याचे प्राजक्ता माळी म्हणाल्या. या प्रकरणात आता महिला आयोगाकडून देखील कारवाई करण्यात येत आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज पत्रकार परिषद घेत अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी केलेल्या तक्रारीबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. तसंच प्राजक्ता माळी यांनी केलेल्या तक्रारीचा अर्ज हा मुंबई पोलिसांना देखील पाठवण्यात आल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले आहे. रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांचा राज्य महिला आयोगाकडे तक्रार अर्ज प्राप्त झाला. यामध्ये मागील दीड ते दोन महिन्यांमध्ये विविध यु-ट्यूब चॅनल, पेज आणि अश्लिल भाषेतील कमेंट्स यांची नोंद करत राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. यामध्ये तक्रारीत प्राजक्ता माळी यांनी नमूद केलं आहे की, या कमेंट्समुळे त्यांच्या वैयक्तीय आयुष्य आणि करिअरवर परिणाम झाला आहे. चारित्र्य हणण करणाऱ्या वक्तव्यांमुळे प्रचंड मनस्ताप कुटुंबाला झाला आहे. त्यामुळे राज्य महिला आयोगाने या सगळ्याची दखल घ्यावी आणि त्यावर कारवाई करावी, अशी तक्रार करणारा अर्ज प्राजक्ता माळी यांनी राज्य महिला आयोगाला दिला. या प्रकरणात अधिक तपास केला जात असल्याचे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितले.

Updated : 30 Dec 2024 6:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top