पूरग्रस्त भागांमध्ये तातडीने स्वच्छता मोहीम राबवा; यशोमती ठाकूर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
X
अमरावती जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांमध्ये तातडीने स्वच्छता करून कोणत्याही प्रकारची रोगराई पसरू नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिले आहे. ठाकूर यांच्या निर्देशनंतर प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली असल्याचे सुद्धा पाहायला मिळत आहे.
यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी जिल्ह्यातील दहिगाव रेचा राईचा या पूरग्रस्त गावाची पाहणी केली. दहीगाव रेचा या गावात बंधारा फुटल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती, अनेक घरांची पडझड तसेच शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच गावांमध्ये सगळीकडे अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेत, पाहणी दरम्यान गावामध्ये कोणत्याही प्रकारची रोगराई पसरू नये यासाठी खबरदारीच्या उपाययोजना म्हणून तातडीने स्वच्छता करण्याचे निर्देश ठाकूर यांनी दिले आहेत.
तसेच त्यांनी नाला रुंदीकरण करण्याचे आदेशही प्रशासनाला यावेळी दिले. तसेच पूरग्रस्त नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेत, गावातील नुकसान झालेल्या गावकऱ्यांना योग्य ती मदत लवकरच दिली जाईल असे आश्वासनही त्यांनी या भेटीदरम्यान दिले.