''मी तुम्हाला शरण यावं एवढी तुमची औकात नाही'' पंकजा मुंडेंचा टोला कुणाला?
X
गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या स्मृती दिनानिमित्त गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांनी मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना "तुम्ही माझी चिंता करून नका. मला सगळे विचारतात तुमचं काय भविष्य आहे? उद्या काय होणार आहे? तुम्हाला काय मिळणार आहे? याची मला खरंच चिंता नाही. मला याची अजिबात चिंता नाही. दिलेल्या संधीचं सोनं करणे हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहे. अस म्हणत त्यांनी यावेळी पक्षांतर्गत विरोधकांनाही अप्रत्यक्ष टोले लगावले.
आज गोपीनाथ गडावर आयोजित केलेल्या या कार्यक्रमास मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण हे प्रमुख उपस्थितीत होते. मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे गोपीनाथ गडावर या कार्यक्रमाचे आयोजन करता आले नव्हतं. त्यामुळे कोरोनानंतर आता पहिल्यांदाच गोपीनाथ गडावर आज मोठ्या प्रमाणावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे आज अनेक मुंडे समर्थक गोपीनाथ गडावर मोठ्या संख्येने आले होते. यावेळी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, "माझ्या पराभवाचं देखील मला सोनं करता आलं याच्या एवढी पुण्याई कोणाकडे आहे. हा पराभव मला दिल्लीपर्यंत घेऊन गेला. हा पराभव मला खूप शिकवून गेला. तिथून शिकून मी तुमच्या सेवेसाठी अविरत काम करणार आहे. मी तुम्हाला एवढच सांगेन की या मंचावर बसणारा कोणी असेल, ते आपलं भविष्य घडवू शकत नाहीत तर तुम्ही तर कोणाचं भविष्य घडवायचं हे तुमच्या हातात आहे.