Home > Political > "तुम्ही काळजी करू नका.." पंकजा मुंडेबाबत प्रश्न सुरू होताच देवेंद्र फडणवीस यांची कलटी

"तुम्ही काळजी करू नका.." पंकजा मुंडेबाबत प्रश्न सुरू होताच देवेंद्र फडणवीस यांची कलटी

तुम्ही काळजी करू नका.. पंकजा मुंडेबाबत प्रश्न सुरू होताच देवेंद्र फडणवीस यांची कलटी
X

पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेचे तिकीट नाकारल्यानंतर त्या नाराज आल्याची राज्यात मोठी चर्चा आहे. मागील काही दिवसंपासूम आपण पाहिलं असेल तर बीडमधील भाजपा कार्यकर्ते आणि पंकजा मुंडे समर्थक यांनी थेट भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत तीव्र नाराजी व्यक्त केलीय. पंकजा मुंडे भावी मुख्यमंत्री होतील या भीतीपोटी आणि इर्षेपोटी 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत पंकजा ताईंना डावलण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला. धनंजय मुंडे यांना मदत केली असा गंभीर आरोप भाजपतीलच स्थानिक नेत्यांनी केल्याने बीड भाजपामधील पक्ष पातळीवरील खदखद समोर आलीय..एकीकडे राज्यसभेच्या विजयोत्सव साजरा करणाऱ्या भाजप समोर पंकजा मुंडे समर्थकांना शांत करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे..

याच संदर्भात आज देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी, पंकजा मुंडे पक्षाच्या मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्याकडे मध्यप्रदेशचा चार्ज आहे. आम्ही सगळे एकमेकांच्या संपर्कात असतो तुम्ही काळजी करू नका असं वक्तव्य केलं आहे. विधानपरिषदमध्ये पंकजा मुंडे यांचा पत्ता कट केल्यानंतर भाजप पक्षश्रेष्ठी व देवेंद्र फडणीस यांना सद्बुद्धी मिळावी, याकरिता पंकजा मुंडे समर्थकांनी चक्क हनुमान मंदिराच्या समोर हनुमान चालीसाच पठण करत साकडे घातले होते. यावेळी घोषणाबाजी देखील करण्यात आली. विधानपरिषदेच्या यादीत पंकजा मुंडेचे नाव न आल्याने राज्यभर पंकजा मुंडे समर्थक यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी थेट पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना इशारा दिला आहे. काल बीडमध्ये विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांची गाडी आडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांनी प्रवीण दरेकर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करत घोषणाबाजी केली.

पंकजा मुंडेंबाबत देवेंद्र फडणवीस नक्की काय म्हणाले..

विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आज मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पंकजा मुंडेंबाबत बोलताना ते म्हणाले की, पंकजा मुंडे पक्षाच्या मोठ्या नेत्या आहेत. त्यांच्याकडे मध्यप्रदेशचा चार्ज आहे. त्यामुळे त्या सातत्याने मध्यप्रदेशला जात असतात. सध्या तिकडे इलेक्शन आहे व तिथला प्रभार त्या सांभाळत आहेत. आम्ही सगळे एकमेकांच्या संपर्कात असतो तुम्ही काळजी करू नका. भारतीय जनता पार्टी हा एक परिवार आहे आणि आम्ही सगळे या परिवाराचे घटक आहे असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल. हा प्रश्न संपताच पत्रकारांनी पंकजा मुंडे यांच्याबाबत आणखीन प्रश्न विचारायला सुरुवात केली. यावेळी मात्र देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद संपवली.

पंकजा मुंडे मात्र शांत..

इतका सगळा गोंधळ होत असताना यावर पंकजा मुंडे यांनी मात्र अद्याप एकही वक्तव्य केलेले नाही. पण त्यांचे समर्थक मात्र आता नाराजी व्यक्त करु लागले आहेत. पण पंकजा मुंडे शांत का आहेत? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. पंकजा मुंडे पक्ष नेतृत्वाविरोधात थेट का बोलत नाही आहेत अशी सुद्धा चर्चा आता सुरू झाली आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणावर पंकजा मुंडे या सगळ्या प्रकरणावर आपले मौन कधी सोडणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.


Updated : 13 Jun 2022 8:51 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top