सोनिया गांधींवर टीकेप्रकरणी अर्णब गोस्वामींना ३ आठवड्यांचा दिलासा
X
रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांनी कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी (Soniya Gandhi) यांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभरात अनेक ठिकाणी 100 हून अधिक गुन्हे दाखल केले आहेत. या संदर्भात आज अर्णब गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पाडली.
संबंधित बातम्या...
- अर्णब गोस्वामी प्रकरणात केतकी चितळेचा जितेंद्र आव्हांडांना टोला का?
- अर्णब गोस्वामी Vs सोनिया गांधी
- आय रिजेक्ट यु अर्नब
न्यायमुर्ती डी.वाय. चंद्रचूड आणि न्यायमुर्ती एम. आर. शाह यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी पार पडली आहे. अर्णब यांच्या बाजूने ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली.यावेळी मुकुल रोहतगी यांनी अशा प्रकारे एकाचवेळी अनेक एफआयआर दाखल होणं हा पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावरचा हल्ला असल्याचा युक्तीवाद केला.
तर, सोनिया गांधी यांच्या वतीनं कपिल सिब्बल यांनी बाजू मांडताना अर्णब यांच्या विरोधातील एफआयआर एकत्रित करुन एकाच ठिकाणी केस चालू शकते. पण एफआयआर रद्द होऊ नये. पोलिसांना त्यांचं काम करु द्यावं. फ्रीडम ऑफ स्पीच हे फ्रीडम ऑफ फेक स्पीच होऊ शकत नाही. काँग्रेस कार्यकर्त्यांनी,नेत्यांनी एफआयआर दाखल केल्या आहेत. So what? हा बचावाचा मुद्दा कसा होऊ शकतो? भाजप कार्यकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकांवर राहुल गांधी कोर्टात हजेरी लावतात. अर्णब गोस्वामी यांना काय अडचण होऊ शकते? असा युक्तीवाद कपील सिब्बल यांनी केला आहे.
या युक्तीवादानंतर न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना जामीन अर्ज दाखल करण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी दिला आहे. तसंच या काळात त्यांना अटक होऊ नये असं सांगितलं आहे.
न्यालयाने मुंबई पोलिस कमिश्नर यांना रिपब्लिक टीव्ही च्या ऑफिसला सुरक्षा देण्यास सांगितलं आहे. एकाच गुन्ह्याचा तपास देशात वेगवेगळ्या ठिकाणी नाही होऊ शकत. अर्जदाराने सर्व ठिकाणच्या केसेस एकत्र जोडून अर्ज करावा. असं न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे.