अर्णब गोस्वामींची कोंडी, दोन वर्षापुर्वीचं ‘ते’ आत्महत्या प्रकरण पुन्हा बाहेर
X
पालघर मॉब लिंचींगमधील सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्यावरील टीका आणि बांद्रा स्थानकाजवळील जमावाप्रकरणी (Bandra Migrant Mob) सामुदायिक द्वेष निर्माण करणाऱ्या वक्तव्यांच्या आरोपानंतर रिपब्लिक भारतचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) आता पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. २०१८ मध्ये इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक आणि त्यांच्या आईनं आत्महत्या केली होती. या प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हे ही वाचा...
- ‘त्या’ व्हिडीओचा संबंध मशिदीशी जोडल्यामुळे अर्णब विरोधात गुन्हा दाखल
- सोनिया गांधींवर टीकेप्रकरणी अर्णब गोस्वामींना ३ आठवड्यांचा दिलासा
- अर्णब गोस्वामी Vs सोनिया गांधी
दोन वर्षांनंतर , ५ मे रोजी नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी या प्रकरणी पुन्हा चौकशी करण्यात यावी, अशी मागणी व्हिडिओद्वारे केली. या मागणीवर राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पोलीस विभागामार्फत योग्य ती कारवाई करण्यात येईल आणि त्यांना न्याय मिळवून दिला जाईल असं आश्वासन दिलं आहे.
काय आहे हे प्रकरण ?
कॉन्कर्ड डिझाइन्स लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अन्वय नाईक आणि त्यांच्या आई कुमुद यांनी २०१८ मध्ये अलिबागमधील काविर गावातील त्यांच्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी अन्वय यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. अर्णब गोस्वामी यांनी पैसे थकवल्यामुळं आत्महत्या करत असल्याचं त्या चिठ्ठीत लिहलं होतं. नाईक यांनी रिपब्लीक भारतच्या स्टूडिओचं काम ५०० माणसांच्य़ा मदतीने रात्रंदिवस राबत करवून घेतलं होत असं त्यांच्य़ा पत्नीने सांगितलं आहे. त्यानंतर नाईक यांच्या पत्नी अक्षता यांनी तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी गोस्वामी यांच्यासह तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता.
एफआयआर दाखल केल्यानंतर दोन वर्षांत पुढे कोणतीही कारवाई झाली नाही. चौकशीसाठी घेतलेले मोबईल आणि लॅपटॉपही अद्याप त्यांना परत केलेले नाहीत. तसंच माझ्या आणि मुलीच्या जीवाला धोका असून, आम्हाला काही झालं तर अर्णब गोस्वामी, अनिल पारसकर, सुरेश वऱ्हाडे हे पोलिस अधिकारीही त्यास जबाबदार असतील, असंही त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं.
Mrs.Akshata Naik has alleged that her entrepreneur husband and her mother in law had to commit suicide due to non payment of dues from Mr. Arnab Goswami's @republic.
This is serious and needs further investigation. pic.twitter.com/sp0dovnMDr
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) May 5, 2020
कॉंग्रेसने ट्वीटरवर नाईक यांचा व्हिडीओ शेअर करुन हे प्रकरण गंभीर असून, चौकशी करणे गरजेचे आहे, असं काँग्रेसनं म्हटलं आहे. एकुणच अर्णब यांच्यासमोरील अडचणी आता अधिकच वाढताना दिसत आहेत.