शिवसेनेचा एक खासदार शिंदे गटात जाणार..
X
एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे 40 हून अधिक आमदार गेले. शिंदे यांच्यासोबत या आमदारांनी केलेल्या बंडानंतर आता शिंदे गटात शिवसेनेचे काही खासदार देखील जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. आज एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले आहेत. दिल्लीत त्यांनी भाजपच्या नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या संपर्कात कोण खासदार आहेत? याविषयी बोलताना त्यांनी एक खासदार नक्की संपर्कात असल्याचं सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली दौऱ्या दरम्यान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंग, भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदी यांची भेट घेण्याअगोदर या दोघांनी पत्रकार परिषद घेत या दौऱ्याचे कारण स्पष्ट केले. नव्याने सरकार स्थापन केले असल्याने हा सदिच्छा दौरा असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाली नसल्याचे सांगितले. या दौऱ्यात फार काही राजकीय एजेंडा नव्हता असेही म्हणाले. यावेळी त्यांना पत्रकारांनी तुमच्या संपर्कात काही खासदार देखील आहेत का? असा प्रश्न विचारला यावर बोलताना त्यांनी आमच्या संपर्कात कोणीही खासदार नसल्याचे त्यांनी सांगितलं. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलत असताना मध्येच सांगितलं की, कोणीही खासदार संपर्कात नाही मात्र एक खासदार नक्की संपर्कात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हे खासदार आहेत आणि श्रीकांत शिंदे हे एकमेव खासदार आमच्या संपर्कात असल्याचं ते म्हणाले..
यानंतर संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना ५० खोके दिले गेल्याचा आरोप केल्याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारले असता, कसले खोके मिठाईचे खोके का, असा टोला लगावला. यानंतर मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्टीकरण देताना सांगितले की, एखादा ग्रामपंचायत सदस्यसुद्धा पक्ष बदलताना किंवा इकडून तिकडे जाताना अनेकवेळा विचार करतो. मग हे आमदार तर 3 ते 4 लाख लोकांनी निवडून दिलेले आहेत, त्यांनी हा धोका का पत्करला, आम्हाला सभागृहात सावरकरांच्या बाजूने बोलता येत नव्हते, अनेक बाबतीत तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागला, त्यामुळे बंड केल्याचे शिंदे यांनी सांगितले. बाळासाहेबांनी आदेश दिला होता की अन्यायाविरोधात लढले पाहिजे, त्याप्रमाणे सगळे आमदार स्वताहून आलेले आहेत पण ते पैशाने विकले जाणारे नाहीत, असे उत्तर त्यांनी दिले.
उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यास आपण तयार आहात का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला तेव्हा, आम्ही अनेकवेळा उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले. तसेच कोणत्याही आमदाराने गद्दारी केलेली नाही तर आम्ही क्रांती केली आहे, असा दावाही त्यांनी यावेळी केली. तसेच भाजप शिवसेनेची युती ही नैसर्गिक युती आहे, जनतेने ज्यांना मतदान केले ती ही युती आहे, असेही यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले.