Home > Political > गुलाबराव पाटलांचे थोबाड चित्रा वाघ आता फोडणार का?

गुलाबराव पाटलांचे थोबाड चित्रा वाघ आता फोडणार का?

गुलाबराव पाटलांचे थोबाड चित्रा वाघ आता फोडणार का?
X

"आपल्या परिसरातले रस्ते हेमामालिनीच्या गालासारखे गुळगुळीत झाले आहेत" असे महिलांविषयक अपमानजनक वक्तव्य माजी मंञी गुलाबराव पाटल यांनी केल्यानंतर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ या चांगल्याच आक्रमक झाल्या होत्या. चित्रा वाघ या नेहमीच महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवत असतात. यावेळी देखील त्यांनी गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानंतर " गाल पाहणा-यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही'' असं म्हणत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपची महिला आघाडी देखील अत्यंत आक्रमक झाली होती. या सर्व प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणात माफी देखील मागितली होती. पण महिलांबाबत इतकं अपमानजनक वक्तव्य करून देखील त्यांना मंत्रीपदावरून हटवण्यात आले नव्हते.

आता महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस यांचे नवीन सरकार आले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात उभी फूट पाडत बंड केला आणि सेनेचे 40 पेक्षा अधिक आमदार आपल्या सोबत नेले. आता याच गटाला भाजपने पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आता राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ देखील घेतली. आता या शपथविधीनंतर राज्यात मंत्रीपदासाठी रसिखेच चालू आहे. मंत्रीपदाच्या या स्पर्धेत शिंदे गटात सामील झालेले गुलाबराव पाटील यांना सुद्धा संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यांच्याकडे कुठल्यातरी मोठ्या खात्याची जबाबदारी मिळू शकते असे देखील म्हटले जात आहे.

गुलाबराव पाटील यांनी महिलांविषयक अपमान जनक वक्तव्य केल्यानंतर," रांझ्याचा पाटील आणि गुलाब पाटील यांची वृत्ती एकच. महिलांचा अवमान करणाऱ्या रांझ्याच्या पाटलाची "पाटीलकी" ही छत्रपती शिवाजी महाराजांनी काढून घेतली होती. आता गुलाब पाटील याचे मंत्रिपद काढून घेणार का? असा संतप्त सवाल महिलांच्या अवमनाच्या मुद्द्यावर रोखठोक भूमिका घेणाऱ्या आणि कोणत्याही आमिषाला, दबावाला बळी न पडता आपल्या भूमिकेवर कायम राहणाऱ्या भाजपा नेता चित्रा वाघ यांनी केला होता. आता भाजपसोबत नवीन स्थापन झालेल्या सरकारमध्ये गुलाबराब पाटील यांना मंत्रीपद मिळणार असेल तर त्यांच्या विरोधात त्या इतकीच आक्रमक भूमिका घेणार का? गुलाबराव पाटील यांचे थोबाड फोडीन म्हणणाऱ्या चित्रा वाघ आता आशा महिलांचा अपमान करणाऱ्या व्यक्तीला मंत्रिमंडळात सामील केल्यानंतर कुणाचे थोबाड फोडणार? की जे होईल ते फक्त बघत राहणार हे पाहावे लागेल.


शिवसेनेच्या महिला नेत्याअयोध्या पौळ पाटील यांनी सुद्धा यासंदर्भातील एक ट्विट केलं आहे. त्यांनी ट्विट करत म्हंटल आहे की, स्वयंघोषित द ग्रेट महिला नेत्या तथा आमच्या लाडक्या चित्रा वाघ काकू गुलाबराव पाटलांचे गाल लाल करायला आणि संजय राठोडचा चौरंगा करायला विसरलात का? म्हटलं आठवण करून द्यावी.

Updated : 2 July 2022 7:13 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top