चित्रा वाघ यांनी केली चंद्रकांत पाटलांची महात्मा फुलेंशी तुलना, अमोल मिटकरी आक्रमक..
X
"घराघरात सावित्री झाल्या आहेत, आम्हाला आता चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या ज्योतिबांचा शोध आहे" असं म्हणत भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी केली आहे. या विधानावर आता अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
मागच्या अनेक दिवसांपासून राज्याच्या राजकारणात चित्रा वाघ हे नाव वारंवार चर्चेत आहे. टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेदच्या कपड्यांवरून त्यांनी तिच्यावर निशाणा साधला होता. उर्फीचा नंगानाच खपवून घेणार नाही असं म्हणत चित्रा वाघ यांनी तिला अटक करण्याची मागणी केली होती. त्यानंतर या दोघांमध्ये समाज माध्यमांवर चांगलेच शाब्दिक युद्ध रंगल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. उर्फी जावेद आणि चित्रा वाघ प्रकरण आता काहीसे शांत होऊ लागल्यानंतर वाघ यांनी आता आणखीन एक वक्तव्य केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी चंद्रकांत पाटील यांची तुलना महात्मा फुले यांच्याशी केली आहे."घराघरात सावित्री झाल्या आहेत आम्हाला आता चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या ज्योतिबांचा शोध आहे" असं विधान त्यांनी केला आणि त्यांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी चांगलेच आक्रमक झाले.
चित्रा वाघ व चंद्रकांत पाटील पुण्यातील एका हळदीकुंकवाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी चंद्रकांत पाटील यांचं तोंडभरून कौतुक केलं. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, आज पहिल्यांदाच एका महिलेला पाच पुरुषांनी ओवाळले. म्हणजे दादा नेहमीच काहीतरी वेगळे परिवर्तन घडवतात हे मी नेहमीच मनात आले आहे. पुणे हे शक्तीचं केंद्र आहे. पुण्यातूनच सर्व स्त्रीशक्तीच्या चळवळींची सुरुवात झाली. आम्हाला सावित्री घरोघरी दिसत आहेत मात्र चंद्रकांत दादा आणि हेमंत सासणे यांच्यासारख्या ज्योतिबांचा शोध मात्र अजूनही जारी आहे असे ज्योतिबा समाजात जास्तीत जास्त निर्माण व्हावेत असं वक्तव्य वाघ यांनी केले. याबाबत त्यांनी ट्विट देखील केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी विशेष टिप लिहीत म्हंटल आहे ''ज्यांची हे समजायची कुवत नाही त्यांनी उगा आदळआपट करू नये..''
सावूमाईने आम्हाला शिक्षित सक्षम केले त्यामुळे सावित्री तर आता घरोघरी दिसत आहेच पण स्त्रीशक्तीला नविन आयाम/सन्मान देणारे चंद्रकांतदादा हेमंत रासने सारख्या ज्योतीबांचा शोध जारी आहे असं म्हंटल तर वावग ठरणार नाही..
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 29, 2023
विशेष टीपः ज्यांची हे समजायची कुवत नाही त्यांनी उगा आदळआपट करू नये pic.twitter.com/75La4h5qJh
हे विधान इतर पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केलं असतं तर?
चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटील यांची तुलना महात्मा फुले यांच्याशी केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी चांगलेच आक्रमक झाले आहेत त्यांनी ट्विट करत म्हंटले आहे की,पुण्यात बोलताना चित्रा वाघ यांचं अजब विधान, वाघ यांच्याकडून चंद्र.पाटील यांची तुलना थेट महात्मा ज्योतिबा फुलेंशी ! "तुम्हाला सावित्रीबाई घरोघरी दिसायला लागल्या आहेत,चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या ज्योतिबाचा शोध जारी आहे" हेच विधान इतर पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केले असते तर?
पुण्यात बोलताना चित्रा वाघ यांचं अजब विधान, वाघ यांच्याकडून चंद्र.पाटील यांची तुलना थेट महात्मा ज्योतिबा फुलेंशी !
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) January 29, 2023
"तुम्हाला सावित्रीबाई घरोघरी दिसायला लागल्या आहेत,चंद्रकांत पाटील यांच्यासारख्या ज्योतिबाचा शोध जारी आहे" हेच विधान इतर पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केले असते तर?