संगमनेर राडा - जखम मांडीला, मलम शेंडीला
X
भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यानंतर संगमनेरमध्ये मोठा गदारोळ झाल्याचे दिसून आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होत गाड्यांची जाळपोळ केली आणि थोरात समर्थक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांनी पोलीस स्टेशन समोर ठिय्या आंदोलन केले. मात्र, हा आचारसंहितेचा भंग असल्याचे म्हणत जयश्री थोरात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल(शनिवारी) संगमनेर तालुका पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्यामुळे जयश्री थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे यासह 50 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. आचारसंहिता भंग करत जमावबंदी आदेशाचा उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वसंतराव देशमुख यांचं वादग्रस्त वक्तव्य काय?
भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंत देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. वसंतराव देशमुख म्हाणाले की, "भाऊसाहेब थोरात यांची नात, ती तर बोलती म्हणत्यात... माझा बाप सगळ्याचा बाप, काही कळत नाही. तुला सुद्धा पोरं कशी झाली हा प्रश्न आहे. आपल्या कन्येला समजवा. नाहीतर आम्ही जर निवडणूक काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही. तिला सुजय दादा प्रेमाने ताई म्हणतात. बरोबर आहे, त्यांची संस्कृती आहे ती. पण दादा, या ताईचे पराक्रम जर पाहिले ना… सगळ्या तालुक्याला माहिती आहेत, असं वसंतराव देशमुख म्हणाले. त्यांच्या या विधानाने वाद निर्माण झाला आहे. आता या प्रकरणात वसंत देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी वसंतराव देशमुख यांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया
बाळासाहेब थोरात यांनी घडलेल्या घटनेचा आणि विधानाचा तीव्र शब्दांत केला आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले की, पूर्वीचे राजकारण तात्विक पद्धतीने चालत होते. गेल्या पाच वर्षांत राजकारणाचा स्तर घसरला आहे. सुजय विखेंच्या कार्यकर्त्यांनी माझ्या मुलीबद्दल जे गलिच्छ वक्तव्य केले आहे. त्याचा महाराष्ट्रातून निषेध होत आहे. मी महाराष्ट्राचे नेतृत्व करत आहे, यामुळे तेथील जनतेने आम्ही पाहून घेऊ असा मला निरोप धाडला आहे. म्हणून माझे कार्यकर्तेच हे प्रकरण पाहत आहेत. जयश्री आणि जनता हे सांभाळायला समर्थ आहे. एकीकडे लाडकी बहीण योजना म्हणायची आणि दुसरीकडे असले विचार ठेवायचे. त्या नेत्याच्या बोलण्यावर स्टेजवरील मंडळी टाळ्या वाजवत होते. हे किती दुर्दैवी आहे. त्यांच्या मेंदूतच हा विचार आहे. जयश्री सोडा हे सर्व महिलांविरोधातील वक्तव्य आहे. प्रत्येकाच्या घरात मुलीबाळी आहेत. या मागचा जो मेंदू आहे यांनासुद्धा धडा शिकविण्याची वेळ आलेली आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.