मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार, महापालिकेने दिले चौकशीचे आदेश- महापौर
X
कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असताना मुंबईतील सायन ह़ॉस्पिटलमध्ये (Sion Hospital) एका कक्षात ट्रॉलीवर मृतदेह ठेवलेले असून तिथेच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. महापालिकेनेही आता या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. या सर्वप्रकारावर सायन हॉस्पिटलतर्फे निवेदन जारी करण्यात आले असून या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा...
- ‘आकडे लावायची सवय त्यांना असेल’, किशारी पेडणेकरांचा नितेश राणेंना टोला
- Covid19 : किेशोरी पेडणेकरांनी घेतली परिचारिकांची भेट, सांगितल्या 'या' गोष्टी
- अर्णब गोस्वामींची कोंडी, दोन वर्षापुर्वीचं ‘ते’ आत्महत्या प्रकरण पुन्हा बाहेर
या व्हिडिओची सत्यता आणि वास्तविकता पडताळण्यासाठी एक चौकशी समिती नेमण्यात आली असून २४ तासांच्या आत त्याचा अहवाल मागवण्यात आला आहे. या चौकशीत दोषी आढळलेल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. याआधीच्या आदेशानुसार कोविड-१९ कक्षातील तसेच संशयित कोविड रुग्णांच्या कक्षातील मृतदेह, मृत्युनंतर ३० मिनिटांमध्ये रुग्णाच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्याचे आदेश देण्यात आले होते.
पण अनेकवेळा रुग्णांचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी येत नाहीत, वारंवार फोन करूनही ते येण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे ते मृतदेह शवागारात ठेवण्यात येतात. पण तरीही अशा घटना घडू नये म्हणून सक्त आदेश देण्यात आल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
दरम्यान मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pedanekar) यांनीही अशा घटना यापुढे घडू नये यासाठी, मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला नाही तर महापालिकेने मृतदेहाची विल्हेवाट लावायची का? याबाबत धोरण ठरवणार असल्याचे सांगितले आहे.