'लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची रिक्त पदे राहण्याचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांचे'- चाकणकर
लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची रिक्त पदांवर भाजप- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाची मालिकाच सुरू झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजपकडून टीका झाल्यानंतर आता राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकर यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे.
X
पुणे// लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची रिक्त पदे भरण्यावरून मागील काही दिवासांपासून राजकिय वातावरण चांगलेच तापलेले असताना, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर भाजप नेते माधव भांडारी आणि महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार टीका केली होती. या टीकेला
राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "काम करो ऐसे भाई, फिर पडे ना पछताना" असं ट्विट करत त्यांनी त्यासोबत एक व्हिडीओ देखील पोस्ट केला आहे.
रुपाली चाकणकर यांनी ट्विट केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे की, लोकसेवा आयोगाच्या सदस्यांची अनेक पदे रिक्त असल्याने लोकसेवा आयोगाची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि एकुणच लोकसेवा आयोगाच्या कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. मात्र, या सर्व परिस्थितीला देवेंद्र फडणवीस जबाबदार असून जागा रिक्त राहण्याचे श्रेय हे फडणवीस यांचेच असल्याचे चाकणकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबधित सदस्यांची यादी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सादर केली आहे. मात्र, बहुधा राज्याच्या हिताचा कोणताही निर्णय असेल तर त्यात खोडा घालण्याचा एक कलमी कार्यक्रम माननीय राज्यपाल महोदयांचा असावा असं रूपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.त्यामुळे राज्याच्या इतर निर्णयाप्रमाणेच हा देखील निर्णय रखडला आहे असं चाकणकर म्हणाल्या.
दरम्यान राजकिय हट्टापायी सातत्याने राजभवनाच्या पायऱ्या झिझवणाऱ्या भाजप नेत्यांनी राज्याच्या हिताच्या कामासाठी राजभवनात जावं असं सांगायला चाकणकर विसरल्या नाहीत.विरोधकांना सर्व गोष्टींची कल्पना असताना केवळ विरोधाला विरोध करणं ही त्यांची मजबूरी असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. दरम्यान चित्रा वाघ यांचे नाव न घेता चाकणकर यांनी त्यांच्यावर देखील टीका केली आहे. काही लोक या पक्षातून त्या पक्षात गेले आहेत, त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची मर्जी राखण्यासाठी त्यांना बोलावं लागतं त्यांचा आम्हाला राग येत नाही. मात्र, त्यांच्या विचारांची आम्हाला किव वाटते असं चाकणकर यांनी म्हटलं आहे.
"काम करो ऐसे भाई, फिर पडे ना पछताना".
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) August 2, 2021
१/२ pic.twitter.com/pn3qtzJQed
दरम्यान लोकसेवा आयोगाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी आणि भाजप आमने-सामने आल्याने चाकणकर यांच्या या टीकेला भाजप नेत्यांकडून काय प्रत्युत्तर येते हे पाहणं महत्वाचं आहे. मात्र, राजकीय आरोप - प्रत्यारोप सुरू असतांना लोकसेवा आयोगातील रिक्त पदे भरून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी सुरू असलेला खेळ थांबवण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.