"ये आपको शोभा नही देता" ममता बॅनर्जींनी मोदींना फेस टू फेस झापलं
पंतप्रधान मोदींनी अनुभवला ममता दीदींचा ‘दुर्गावतार’ !
X
पश्चिम बंगालमध्ये भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी असा संघर्ष रंगलेला असताना शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी एकाच व्यासपीठावर आले. पण या कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांचा दुर्गावतार पंतप्रधान मोदींना प्रत्यक्ष अनुभवायला मिळाला. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कोलकाताच्या व्हिक्टोरिया मेमोरियल इथे केंद्रीय सांस्कृतिक विभागाने एक कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते, त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांनाही प्रमुख पाहुणे म्हणून इथे निमंत्रित कऱण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांना भाषणासाठी व्यासपीठावर निमंत्रित करण्यात आले, पण त्या भाषणासाठी उभ्या राहताच प्रेक्षकांमधून काहींनी जय श्रीरामचे नारे देण्यास सुरूवात केली. यानंतर मात्र ममता दीदींचा पारा वाढला. त्यांनी माईकवर येऊन "शासकीय कार्यक्रमांची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे आणि त्यासाठी आचारसंहिता असते. हा काही राजकीय कार्यक्रम नाही" या शब्दात आपला संताप व्यक्त केला. एवढेच नाहीतर प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचे आणि अपमानित करायचे हे चांगले नाही, असे म्हणत या अपमानाचा निषेध म्हणून आपण भाषण करणार नाही, असे जाहीर करत त्यांनी आपली नाराजी थेट पंतप्रधान मोदींसमोरच व्यक्त केली.