मराठी माध्यमातली कन्या फोब्सच्या यादीत
अवघ्या २२ व्या वर्षी स्टार्टअप, २४ वर्षी सर्वोत्कृष्ट व्यावसायिका, पंतप्रधानांसोबत अमेरीकेचे दौरे, २९ व्या वर्षी ४०० कोटींच्या कंपनीची मालक आणि जगप्रसिध्द फोर्ब्ज मासिकाच्या यादीत नाव. हे सगळं बारामतीच्या मराठमोळ्या लेकीनं केलंय कोण आहे ही Max Woman? जाणून घेण्यासाठी वाचा हा संपूर्ण लेख...
X
"आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा" या दिवंगत साहित्यिक सुधीर फडके यांच्या कवितेच्या ओळीं प्रमाणेच प्रत्येक बापाने आपल्या मुलीला आकाशात झेप घेण्याची संधी दिली तर ती त्या संधीचं सोनं नक्कीच करते आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करते. अशीच मोकळीक बारामतीच्या एका बापाने आपल्या मुलीला दिली आणि आज तिचं नाव चक्क फोर्ब्ज मासिकाच्या यादीमध्ये आलंय. जगातल्या काही सर्वोत्कृष्ट महिला व्यवसायिकांमध्ये तिची गणना केली जातेय. कोण आहे ही तरूणी? काय आहे तिचा प्रवास? या मराठमोळ्या तरूणीचं नाव आहे आर्या कल्याण तावरे! वय वर्ष फक्त २९! आर्याच्या या स्वप्नवत प्रवासाविषयी जाणून घेऊयात आजच्या या विशेष रिपोर्ट मध्ये!
बालपण
बारामतीमध्ये १२ एप्रिल १९९३ ला मिस्टर एँड मिसेस कल्याण तावरे दांपत्याला गोंडस असं कन्यारत्न झालं. जिचं नाव त्यांनी ठेवलं आर्या! कल्याण तावरे हे पेशाने अभियंता(इंजिनियर) शिवाय त्यांनी स्वतःची बांधकाम कंपनी सुरू केलेली. व्यवसायिक असले तरी शेती देखील सुरूच होती. त्यामुळे घराच्या आजुबाजूला वावर होतंच. बारामतीतलं घर आणि शेतीला प्राधान्य नसेल असं कसं चालेल भाऊ! व्यवसायामुळे कल्याण यांनी सतत मुंबई पुणे फेऱ्या माराव्या लागायच्या. सुट्ट्यांमध्ये हे कुटूंब बारामतीला गावी येत होतं.
आर्या आता मोठी होऊ लागली होती. त्यामुळे बाबा कल्याण तावरे यांनी तिचा पुण्यातील कर्वे रोडच्या अभिनव मराठी विद्यालयात दाखला भरला. शाळेत शिकत असताना आर्याला खेळांचीही आवड निर्माण झाली. हॉकी, लॉन टेनिस यासारख्या खेळांमध्ये ती इतकी निपुण झाली की टेनिसमध्ये तर राष्ट्रीय स्तरावर तीने सहभाग नोंदवला आहे. घरात तसं शिक्षणाला पुरक वातावरण असल्याने अभ्यासात देखील आर्या हुशार होती. तिचं वाचन अफाट होतं. इंग्रजी, मराठी साहित्य ती झपाटल्यासारखी वाचत होती. पु.लं, ग.दि.मा यांच्या साहित्याचा तिच्यावर बऱ्यापैकी प्रभाव पडला होता. आर्याला एक भाऊ देखील आहे त्याचं नाव करण! या दोघांनाही जगाचं नागरीक होता यावं यासाठी तावरे कुटंब दर वर्षी परदेशात जाऊन यायचं. विशेषतः युरोप खंडातील अनेक देश या कुटूंबाने पादाक्रांत केले. तेथील संस्कृती जाणून घेतली. या सगळ्याचे सकारात्मक परिणाम आर्याच्या जडणघडणीत होत होते. याचाच परिणाम असा की उच्च शिक्षणासाठी आर्याने इंग्लंड निवडलं.
उच्चशिक्षण
आर्याला दहावीच्या परिक्षांमध्ये ८९ टक्के गुण मिळाले होते. ज्युनियर कॉलेजचं शिक्षण तिने सिम्बॉइसिस महाविद्यालयातून पुर्ण केलं आणि उच्च शिक्षणासाठी थेट लंडन गाठलं. केंब्रिज आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॉलेज लंडन या दोन्ही विद्यापिठांच्या पात्रता परिक्षा क्रॅक केल्या होत्या. केंब्रिजमध्ये तर तिला लँड इकॉनॉमिक्स चा कोर्स ऑफर करण्यात आला होता पण त्यात तिला रस नसल्याने तिने तो नाकारला. युनिव्हर्सिटी ऑफ कॉलेज लंडनने तिने अर्बन प्लॅनिंग, रिअल ईस्टेट आणि फायनान्स असा कॉम्बो कोर्स तिने निवडला. तिथे पदवी पुर्ण केली. वयाच्या फक्त १८ व्या वर्षी तिने लंडन गाठलं होतं.
कल्पना कशी सुचली?
महाविद्यालयीन शिक्षण पुर्ण करत असताना आर्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये स्थानिक बिल्डरकडे काम केलं. तिथलं विद्यापिठ पार अप्रतिम आहे. मुलांना कायम पाठींबा देते. ७० ते ८० या वयोगटातील शिक्षक देखील या विद्यापिठांमध्ये उपलब्ध आहेत. जे विद्यार्थ्यांना नेहमी मदत करण्यासाठी सज्ज असतात. विद्यापिठानं आर्याला तिच्या कल्पनांना सत्यात उतरवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. तिला ऑफिस दिलं. तिला स्टाफ दिला. स्थानिक बांधकाम व्यवसायिकांना फंड्सची आवश्यकता असायची. मग आर्याने क्राउड फंडींग करून हा व्यवसाय सुरू केला. यातुनच सुरूवात झाली फ्युचरब्रीक्स या स्टार्टअपची! वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी आर्या ने एका स्टार्टअपची सुरूवात केली होती. शंभर पौंडापासून त्यांना मदत मिळत गेली. ज्याला जमेल तशी क्राऊड फंडींग या स्टार्टअप साठी होऊ लागली. स्वतः आर्याच्या बाबांनी देखील १०० पौंडांची मदत केली होती. ज्यामधून प्रत्येक गुंतवणूकदाराला १० ते १२ टक्के रिटर्न्स मिळाले. आता परिस्थिती उलट आहे अनेक मल्टीनॅशनल कंपनीज तिच्या कंपनीत स्वतःहून तिच्या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी येत आहेत.
अडथळ्यांची चव
लहान वय, त्यात भारतीय मुलगी व्यवसाय करायचाय तोही परदेशात विचार करा कोण विश्वास ठेवेल. पण आर्याने ते देखील शक्य करून दाखवलं. युनिव्हर्सिटी मध्ये शिकत असलेल्या मुलीवर विश्वास कोण ठेवणार पण फॉलोअप घेणं, व्यवस्थित प्रेझेंटेशन देणं या सगळ्या गोष्टी तिने प्रामाणिकपणे पार पाडल्या. याचाच फायदा असा झाला की तिला तिथे राहणाऱ्या भारतीय समुदायाने फार मदत केली. पैसे गुंतवले आणि विशेषतः तिच्यावर विश्वास दाखवला. तिचं पहिलं काम पुर्ण झाल्यावर लहानसा का होइना पण जो नफा झाला त्यामुळे स्थानिक ब्रिटीश गुंतवणूकदारांनीही तिच्या व्यवसायात गुंतवणूक करायला सुरूवात केली.
सध्याची परिस्थिती
आर्याने या अडथळ्यांवर अशा पध्दतीने मात करत हे यश चाखलं आहे. सध्या फोर्ब्जने जाहीर केलेल्या माहितीनुसार आर्याच्या फ्युचरब्रिक्स या कंपनीची ब्रँड व्हॅल्यू ३७ कोटी पौंडांच्या आसपास म्हणजेच ३५० ते ४०० कोटी रूपये आहे. अगदी लहानशा अपार्टमेंटमधून सुरूवात करत आर्याने डेव्हलपर्ससाठी क्राऊड फंडींग केलं. यात तिला जो नफा झाला तो अगदी तुटपुंजा होता पण तीच खरी सुरूवात होती.
पंचविसाव्या वर्षी पुरस्कार
कष्टाचं फळ योग्य वेळी मिळतंच असं म्हणतात तसंच काहीसं आर्याच्या बाबतीतही झालं. अवघ्या २२ व्या वर्षी स्थापन केलेल्या व्यवसायामुळे त्यात घेतलेल्या कष्टांमुळे आर्या ला प्रसिध्दी तर मिळालीच पण तिला इंग्लंडमधील प्रतिष्ठेचा २५ वर्षांखालील सर्वोत्कृष्ट एंत्राप्रिन्युअर चा पुरस्कार मिळाला. शिवाय दोनवेळेस तिला ब्रिटनचे पंतप्रधानांसोबत अमेरिकेचा दौरा करण्याची संधी मिळाली.
भविष्यात भारतामध्ये कंपनीचा विस्तार करणार का?
भारतामध्ये कंपनी विस्तार करण्यास आर्याला अडथळा जाणवतोय तो इथल्या कायद्यांचा... इथे कंपनी विस्तार करण्यात तिला रिस्क वाटतेय. शिवाय इतर आणखीन अडथळे आहेतच. पण एक गोष्ट मात्र नक्की की अनेक भारतीय कंपन्या आर्याच्या कंपनीत पैसे गुंतवत आहेत. हैदराबाद, दिल्लीच्या कंपनीज गुंतवणुकीसाठी पुढे येत आहेत. यापुढे अनेक सरकारी, खाजगी बांधकामांमध्ये गुंतवणूक करून मिळालेला नफा शेअरहोल्डर्समध्ये वाटण्याचा मानस असल्याचा देखील ती सांगते
वडिलांचा आनंद गगनात मावेना
फोर्ब्ज च्या यादीत आर्याचं नाव आलेलं पाहून तिचे वडील कल्याण तावरे यांना सुरूवातीला धक्काच बसल्याचं ते सांगतात. त्यांना लेकीचं इतक्या कमी वेळेत मिळवलेलं हे यश पाहून ते भारावून गेल्याचं ते सांगतात. शिवाय त्यांना आपल्या लेकीचा अभिमान वाटत असल्याचंही ते सांगतात.