मला प्रेरणा, चालना देणारा माझा एकमेव आवडता पुरुष, माझा दादा!
X
१५ वर्षाची असताना माझी १० वी झाली होती. चांगले मार्क्स मिळाले तर आई मोबाईल घेऊन देणार त्यासाठीच मी अभ्यास केला होता. तर अवघे ८१ गुण मिळवून मी पास झाली आणि मला मोबाईल मिळाला. नुकतीच १० वी झाली आपण कॉलेजला जाणार, कॉलेज, मजा-मस्ती अशी अनेक स्वप्न मी रंगवली होती. मग लगेचच मला ट्युशन क्लासेससाठी घरून गाडीही घेऊन दिली. मग तर गाडी, मोबाईल, मैत्रिणी आणि फुल टू मज्जा एवढेच!
फेसबुक, व्हॉटसअप, इंस्टाग्राम यापलिकडे मला काही माहिती ही नव्हते. त्यानंतर याच गोष्टींमध्ये दिवस निघून गेले. १२ वी झाली आणि निकालही लागला. मला ५०% मिळाले. पास झाली होती मी मात्र वेळ हातातून निघून गेली होती. हातात काही उरले नव्हते फक्त पश्र्चाताप आणि स्वतःची वाटणारी लाज. पण कशी तरी माझी एडमिशन b.tech कॉस्मेटिकसाठी अकोल्याला झाली. आणि कसाबसा अभ्यास सुरू झाला होता.
याच वेळेत माझी ओळख एका दादाशी झाली. hi, hello, good morning, good night सोबत आणखी विचारांची देवाण-घेवाण झाली. नंतर दादाच्या सोशल वर्कच्या ग्रुपमध्ये मी जॉईन झाले आणि सोबत अनेक सामाजिक उपक्रम राबविले. या सर्व गोष्टी करत असताना त्यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर पडत गेला.
त्यांनी अनेक गोष्टी शिकवल्या. सांगितल्या. आपण कोण? आपण काय करायला हवे आणि आपण काय करत आहोत? समजात कशाप्रकारे राहावे लागते? इथपासून प्रत्येक गोष्टी मला त्यांच्या कडूनच शिकायला मिळाल्या. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक महापुरुषांबद्दल मी वाचलं!
राजकारणाबद्दलही बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या. पुरोगामी विचार, पुरोगामी चळवळ हे फक्त आणि फक्त मला दादामुळेच कळाले. फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या बाहेरही एक खूप मोठं जग आहे मला कळलं. आजची मी आणि तेव्हाची मी यामध्ये खूप खूप अंतर आहे.
यासोबत समजातही एक वेगळी ओळख आहे. पुढे जर्नालिझम याच क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. बाकी सर्व शक्य झालं ते फक्त दादांमुळेच. दादांच्याच मार्गदर्शनाखाली आणखी खूप गोष्टी शिकायच्या आहेत. तर जागतिक पुरुष दिनानिमित्त आणि मला प्रेरणा, चालना, देणारा माझा एकमेव आवडता पुरुष म्हणजे माझा दादा!
दादा म्हणजेच खामगावचे पत्रकार अमोल गावंडे.
साक्षी पाटील