सदाबहार चिरतरुण अभिनेत्री वर्षा उसगावकर
X
वडील गोव्याचे मंत्री, घरचा श्रीमंती थाट,इंग्रजी माध्यमात झालेलं शिक्षण असं असूनही अभिनयाची आवड म्हणून रीतसर नाटकाचे शिक्षण घेऊन आधी नाटक आणि मग मराठी हिंदी चित्रपसृष्टीत अभिनय कारकीर्द गाजवणारी सदाबहार अभिनेत्री वर्षा उसगावकर.
इंग्रजीत शिक्षण होऊनही मराठी भाषा आणि मराठी संस्कृती,साहित्य, संगीत यांचं ज्ञान असणारी वर्षा उसगावकर ही एक प्रगल्भ अभिनेत्री आहे.कवी बा.भ.बोरकर ,शांता शेळके ते अलीकडच्या काळातील कवी सौमित्र यांच्या कविता विषयी माहिती असणाऱ्या वर्षा उसगावकर यांचा राजकारणा विषयी अभ्यास दांडगा असतानाही आणि अनेकदा विचारणा होऊनही राजकारणात प्रवेश केला नाही.
1998 ला मी दूरदर्शन साठी करत असलेल्या एका कार्यक्रमाच्या शुटींग निमित्ताने माझी आणि वर्षा उसगावकर यांची प्रथम भेट झाली.मराठी चित्रपटांची ग्लॅमरस नायिका म्हणून त्यावेळी त्या यशाच्या शिखरावर होत्या तरी माझ्या सारख्या नवीन दिग्दर्शका बरोबर त्या काम करायला तयार झाल्या.शुटींग साठी त्या मुंबईहून ट्रेन ने येणार होत्या आणि माझा एक मित्र त्यांना स्टेशन वरून कार ने शुटिंगच्या ठिकाणी घेऊन येणार होता.फोन वर आमचे आधी तसे बोलणेही झाले.पण ऐनवेळी सगळा घोळ झाला,माझा मित्र स्टेशन सांगितलं म्हणून पुणे स्टेशन वर वर्षा उसगावकर यांची वाट पहात उभा होता आणि त्या शिवाजीनगर स्टेशनला उतरून तासभर वाट पहात उभ्या होत्या.त्याकाळी मोबाईल नव्हते.त्यांनी माझ्या घरी फोन करून शुटींग करीत असलेल्या ठिकाणचा नंबर घेऊन फोन केला आणि त्या तासभर वाट पाहत उभ्या आहेत आणि आजूबाजूला लोकांनी गर्दी केल्याने त्रास होऊ लागल्याचे सांगितलं.मी त्यांना तिथून बालगंधर्व येथे जाण्यास सांगितले आणि त्या तिथं पोचे पर्यंत माझा कुणीतरी माणूस कार घेऊन तिथे उभा असेल.
शुटिंगच्या त्याच दिवशी रात्री पुन्हा ट्रेन ने वर्षा उसगावकर यांना परत मुंबईत जायचे होते. त्यामुळे वेळेत त्यांचे काम संपले नाहीतर माझे नुकसान होईल म्हणून माझा ताण वाढला होता, वर्षा उसगावकर येईपर्यंत मी विजय चव्हाण, मनोरमा वागळे या कलाकारांचे शॉट घेतले. वर्षा उसगावकर आल्यानंतर त्यांची बोलणी खावी लागणार याची मानसिक तयारी मी केली होती.त्या आल्या तश्या चेहऱ्यावरून जाम चिडलेल्या दिसल्या,मी त्यांना खायला काही हवं का असं विचारल्यावर त्यांनी इडली सांबार सांगितले. इडली सांबार येई पर्यंत मी त्यांना तयार मेकप करून तयार व्हायला सांगितले.त्यावर" मला तयार व्हायला एक तास लागेल" असं त्यांनी उत्तर दिल्यावर मी समजून गेलो की आता या मला मुद्दाम त्रास देणार आहेत. त्यात त्यांनी मागितलेले इडली सांबार आम्ही जिथं शुटींग करत होतो तिथं जवळपास कुठं हॉटेल नसल्यामुळे मिळणं शक्य नव्हतं,मला तर टेन्शन आलं की आता इडली सांबार नाही म्हणून त्या चिडल्या तर माझं शुटींग कसं होणार.मग धाडस करून मी त्यांना सांगितलं की इडली सांबार लगेच मिळणं शक्य नाही त्यासाठी वेळ लागेल.त्यावर "ठीक आहे" इतकंच उत्तर त्यांनी दिलं.ते ऐकून मला वाटलं आता या तासभर काय दोन तास तरी तयार व्हायला लावतील.
त्या मेकप करून कधी रुमच्या बाहेर येतील असं झालं ' ताटी उघडा ज्ञानेश्वरा ' अशी माझी अवस्था झाली माझ्या बरोबर कलाकार आणि टेक्निशयन सगळे वर्षा उसगावकर तयार होऊन रुमच्या बाहेर कधी येतील याची वाट पाहू लागले. वाऱ्याने खिडकीचा आवाज झाला तरी माझी नजर दारा वर जाऊन वर्षाजींनी दार उघडलं का? म्हणून नजर शोध घ्यायची. पंधरा मिनटात त्या तयार होऊन एका हातात त्यांनी घरातून आणलेली विविध फळे कापून भरलेली प्लेट एका हाताने फळं खात दुसऱ्या हातात डायलॉग वाचत एक रिहल्सल करून शूटिंगला सुरुवात केली. माझ्या डोक्यावरचं प्रेशर गेले पण आधी झालेली चिडचिड,त्रास कुठं ही वर्षा उसगावकर यांच्या चेहऱ्यावर नव्हता की काम करताना त्यांनी दाखवून दिलं नाही, जसं काही घडलेच नाही असं दाखवत मला सांभाळून घेत त्यांनी मला सहकार्य केलं.तेंव्हा पासून 1998 पासून ते आजतागायत आमची मैत्री आहे.मनोरंजन क्षेत्रात मी केलेल्या अनेक महत्वाच्या गोष्टींच्या वर्षा उसगावकर साक्षीदार आहेत.
2000 मध्ये त्या वेळच्या अल्फा टिव्ही म्हणजे आत्ताचे झी मराठी,चॅनेल साठी मी अफलातून मालिकेची निर्मिती दिग्दर्शन केले होते,त्याचे टायटल साँग त्यांनी गायले होते.याच मालिकेत एका एपिसोड मध्ये त्यांनी काम केले,त्यावेळी त्यांचा हिरो म्हणून मी अंकुश चौधरी घेतले, अंकुश त्यावेळी नवीनच होता त्याचे फार नाव झाले नव्हते तरी वर्षाजिंनी कसली विचारणा केली नाही की दुसऱ्या कुठल्या हिरो ला घ्या म्हणून हट्ट केला नाही. मी आत्ता पर्यंत जे काही प्रोजेक्ट मालिका, चित्रपट, स्टेज प्रोग्राम वर्षा उसगावकर यांच्या बरोबर केले आहेत तेंव्हा कधीच त्यांनी माझ्या बरोबर कोण कलाकार आहे? यालाच का घेतले दुसरा एखादा घ्या अशी अट घातली नाही.अनेकदा असं करणाऱ्या काही अभिनेत्रींचा अनुभव मी घेतला आहे ज्यांना आपल्या मर्जीतील , बरेचदा त्यांच्या प्रेमात असणारा हिरो च पाहिजे असतो.
मराठी तारका कार्यक्रमातील वर्षा उसगावकर सिनियर कलाकार आहेत. राष्ट्रपती भवन मध्ये राष्ट्रपतींच्या समोर मराठी तारका कार्यक्रम करताना आम्हा प्रत्येकाला टेन्शन होतं,त्यावेळी स्टेजच्या मागे डान्सर,इतर कलाकार वेळेत तयार व्हावे म्हणून प्रिया बेर्डे यांच्या बरोबर वर्षा उसगावकर लक्ष देऊन इतर त तारकांना तयार व्हायला मदत करत होत्या. मराठी तारका चा दुसरा शो मुंबईत मोठं थियेटर उपलब्ध न झाल्यामुळे रवींद्र नाट्य मंदिरात करण्याचे मी ठरवले.या कार्यक्रमाला अनेक मोठे गेस्ट येणार होते त्यामुळे बरेचसे पासेस वाटावे लागले. माझं होणारं आर्थिक नुकसान मला दिसत होतं त्यावेळी वर्षाजीनी त्यांच्या ओळखीचे एक स्पॉन्सर मला मिळवून देऊन मोठी मदत केली. मराठी तारका हा आपला शो आहे ही भावना त्यांच्या मनात नेहमी असते.कार्यक्रमात डान्स करण्या आधी मला हे गाणं नको,मग इतर तारकांना कोणती गाणी दिलीत अश्या चौकश्या कधीही न करणारी वर्षा उसगावकर ही एकमेव तारका आहे.ओळख मैत्री आहे म्हणून माझ्या प्रत्येक प्रोजेक्ट मध्ये, कार्यक्रमात त्यांना संधी दिलीच पाहिजे असा कधीही हट्ट न करणाऱ्या आणि कार्यक्रमात घेतले नाही म्हणून कुरकुर करून दहा ठिकाणी सांगून मैत्रीपूर्ण संबंध बिघडवणारी ही अभिनेत्री नाही.काम मिळतंय म्हणून मैत्री करणाऱ्यांपैकी वर्षा उसगावकर नाहीत.कार्यक्रमात डान्स झाल्यानंतर किंवा शुटींग संपल्या नंतर नेसलेली साडी असो की घातलेला ड्रेस असो तो जसा दिलाय तसा अगदी व्यवस्थित घडी करून त्या परत देणार. साडीला लावलेल्या पिना व्यवस्थित काढून, दागिन्यांना कुठेही केसांचा गुंता अडकलाय असे अजिबात नाही.त्यांची टापटीपता डोळ्यात भरणारी आणि इतरांनाही शिकवणारी. कामाच्या बाबतीत प्रामाणिक आणि दिसण्याच्या बाबतीत जागरूक असणाऱ्या वर्षाजीं कार्यक्रमाला , शूटिंगला येताना स्वतः ला डाएट साठी जे लागतं ते घरातून घेऊन येणार. वर्षा उसगावकर यांनी केलेल्या ग्लॅमरस भूमिका सगळ्यांनी पाहिल्या आहेत पण दूरदर्शनच्या एका कार्यक्रमात, नऊवारी ओचा साडी नेसून त्यांनी साकारलेली संत सखू लाजवाब होती.
चेहऱ्यावरून कडक स्वभावाच्या दिसणारी पण ओळख होताच आपलेपणाने विचारपूस करून छान गप्पा मारणारी सदाबहार मैत्रीण #VarshaUsgaonkar यांना वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्यायला फोन करून नक्की वय किती? असा मिश्किल प्रश्न विचारल्यावर त्याचंही ठरलेलं उत्तर असते " फक्त 21,अजून यौवनात मी".
- महेश टिळेकर