Home > News > पाळी बद्दल ‘हे’ पुस्तक का वाचायला हवं

पाळी बद्दल ‘हे’ पुस्तक का वाचायला हवं

Why you should read this book about menstruation.

पाळी बद्दल ‘हे’ पुस्तक का वाचायला हवं
X

ऐश्वर्या रेवडकर यांनी लिहिलेल्या ‘पाळिचे पॉलिटिक्स’ हे पुस्तक पोस्टानं घरी पोहचलं आणि सहज चाळलं तर खाली ठेवलंच नाही. वाचत गेले आणि पुस्तक संपल्यावरच खाली ठेवलं इतकं सहज, सोपं आणि गुंतवून ठेवणाऱ्या शैलीत लिहिलं आहे.

हरिती पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या या पुस्तकात लेखिकेने पाळी ही स्त्रियांची वैयक्तिक बाब नसून ती कशी सामाजिक विषमतेचे मुळ आहे, स्त्रियांना दुय्यम ठरवण्याचे जाणिवपूर्वक केलेले राजकारण आहे हे मांडले आहे. मासिक पाळीसोबत जोडलेले नियम, निर्बंध आणि रूढी कशा प्रकारे महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक सहभागावर प्रभाव टाकतात याचा या पुस्तकात वेध घेतला आहे.

जाहिराती, चित्रपट आणि माध्यमांमध्ये पाळीबद्दल निर्माण केलेली प्रतिमा कशी अपूर्ण आणि बऱ्याचदा चुकीची असते याबद्दल लिहिताना लेखिका वाचकांच्या हे लक्षात आणून देते की, समाज महिलेकडे केवळ मूल जन्माला घालणारी व्यक्ती म्हणून पाहतो. याचा फायदा घेत पाळी आणि वंध्यत्वाचे मोठे मार्केट उभे करण्यात आले आहे आणि नफा कमवण्याचे साधन म्हणून स्त्रियांकडे पाहिले जाते

पाळी दरम्यान महिलांना प्रचंड दुय्यमत्वाची वागणूक दिली जाते. एकिकडे आपले संविधान समानता, स्वांतत्र्य याची हमी देते. मात्र समाज, सरकार त्या मुल्यांना धाब्यावर बसवत आहे. महिलांना पाळी येते म्हणून सर्रास असमानतेने वागवत आहे.

महिलांनी पाळीत घराबाहेर बसावे, स्वयंपाक घरात जाऊ नये अशी सक्ती करून संविधानेने प्रत्येकाला दिलेला सन्मानाने जगण्याचा अधिकार नाकारला जातो.

सगळ्याच घरांमध्ये असं होतं नसलं, तरी शहरात राहणाऱ्या शिकलेल्या घरांमध्ये देखील कमी अधी प्रमाणात ही दुय्यमत्वाची वागणून बघायला मिळते.

गडचिरोलीमधील आदिवासी भागात आजही कुर्मा सारख्या प्रथा पाळल्या जातात आणि या प्रथांच्या नावाखाली महिलांना घराबाहेर लहान झोपटीत राहण्यास भाग पाडले जाते. ही प्रथा महिलांसाठी कशी योग्य आहे त्यांना पाळीच्या दिवसांत आराम मिळावा म्हणून ही प्रथा पाळली जाते असा दावा रूढी परंपरावाद्यांकडून केला जातो.

वास्तवात त्या पाळीच्या दिवसांत त्या स्त्रिला आराम हवा आहे का? हवा असेल तर तो आराम तिने घरात करावा, घराबाहेर की गावाबाहेर पुरूषांनी ठरवून दिलेल्या जागी? हे ठरवण्याचे साधे स्वातंत्र्यही तिला मिळत नाही. त्यामुळेच हे असंवैधानिक आहे.

समाज एकच गोष्ट डोळ्यासमोर आणू पहातो की, स्त्रियांना मासिक पाळी येते, त्यांच्या गर्भाशयात मूल वाढते आणि बायकाच शेवटी बाळाला स्तनपान करतात. त्यामुळे स्त्रियांनी कसे घरात बसून रहाणे जैविकदृष्ट्या योग्य आहे. मात्र या पुस्तकात हा सामाजिक समज मोडून काढला आहे. त्याबाबत विचार करण्यासाठी लेखिकेने अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत आणि विचार करण्यास भाग पाडले आहे.

स्त्रियांना माता, पत्नी या पलीकडे जाऊन स्वतंत्र्य व्यक्ती म्हणून पहायला हवं आणि त्यासाठी स्त्रियांनी स्वतःही व्यवस्थेचे कावे बारकाईने आतून बाहेरून समजून घेतले पाहिजे, असं आवाहन लेखिका पून्हा पून्हा पुस्तकात करते.

मी स्वतः ज्या शाळेत शिकले त्या शाळेला साध्या वर्गखोल्या सुद्धा नव्हत्या. मग शाळा भरायची ती मंदीरात. मंदीराच्या वर एक खोली होती त्यात. मंदीरात पाचवी, सहावीचे वर्ग भरायचे आणि आठवीचा वर्ग मात्र मंदीराच्या वरच्या खोलीत भरायचा. नववी आणि दहावीसाठी दोन स्वतंत्र खोल्या होत्या.

आठवीत गेल्यावर काही मुलींची मासिक पाळी सुरू व्हायची. पाळी आली असताना मंदीराच्या आवारात प्रवेश करायचा नाही म्हणून त्या मुलींची दर महिन्याला पाच दिवस शाळा बुडायची. यावेळी शैक्षणिक नुकसान व्हायचेच, पण सोबतच तू पाच दिवस शाळेत का आली नाही? या प्रश्नाचे उत्तर काय द्यायचे यातून मुलींचे मानसिक खच्चीकरण देखील व्हायचे.

कितीतरी मुलींना मासिक पाळीत जास्त रक्तस्त्राव होणं, पोटात दुखणं या कारणाने आठवीनंतर शाळा बंद केल्याचेही मला आठवत आहे. त्याचे मुख्य कारण पालकांमधील अंधश्रद्धा होते.

पालकांनी असा समज करून घेतला की, मुलगी शाळेत असताना पाळी आली तर ती मंदीरात असते आणि म्हणून ती आजारी पडत आहे. तिला पाप लागत आहे. पाळीला अपवित्र मानल नसतं, तर आज या मुली शिकून स्वतःच्या पायावर उभ्या असत्या.

मला स्वतःला पाळी आली तेव्हा माझ्या आईने मला सांगितले की पाळी आलेल्या दिवसांमध्ये घराच्या ज्या कोपऱ्यात देव ठेवले आहेत त्या कोपऱ्याकडे जायचे नाही. घर झाडताना तो कोपरा झाडायचा नाही. तुळशीच्या ओट्यावर जायचे नाही.

मला प्रश्न पडला की, ज्या घरात मी लहानची मोठी झाले, त्या घराच्या एका कोपऱ्यात मीच जायचे नाही. तुळस तर स्वतः स्त्री होती असं आई सांगायची आणि तरीही तिथे जायचे नाही म्हणायची. तिला पण तर पाळी येत असणार. मग असं का?

मी असं करण्यास विरोध दर्शवला आणि रोजची कामे करत राहीले. घर झाडण्यासाठी देव ज्या कोपऱ्यात ठेवले आहेत त्या कोपऱ्यात जात राहीले. आई रागावली, वैतागली, घाबरली, पण हळूहळू तिने ते मान्य केले.

स्वतःची समजूत घालण्यासाठी तिने एक हास्यास्पद युक्तीवाद केला की, लग्नाआधी मुलींनी देवाजवळ गेलेले चालते. मी लग्नानंतरही जाते आहे. घरात वहिनीही जातात. आता येवढ्या वर्षांच्या अनुभवानंतर तिला हे उमगले आहे की, पाळी आलेली असताना स्त्रिया देवाजवळ गेल्या तर देवाला काही अडचण नसते. अडचण फक्त तिला होती, समाजाला होती.

लेखिकेने महिलांवरील अन्याय आणि अत्याचार यावर अनेक ठिकाणी ताशेरे ओढत समाज व्यवस्थेला प्रश्न विचारले आहेत.

आत्तापर्यंत स्त्रियांशी संबंधित झालेले संशोधन सुद्धा कसे पूर्वग्रह दुषित आहे. पुरूषांनी केलेले संशोधने कसे त्यांची बाजू अधिक सशक्तपणे मांडत स्त्रियांना दुय्यमत्व देणारी आहेत आणि त्या संशोधनांना पून्हा प्रश्न विचारत नवीन संशोधन होणे त्यात स्त्रियांचा सहभाग असण्याचे महत्व लेखिकेने अधोरेखित केले आहे.

आज वैद्यकीय क्षेत्रात मूली दिसत आहेत. महिला डॉक्टरांकडून ट्रिटमेंट घेण्याची सुविधा आज जेवढ्या सहज उपलब्ध आहे त्याचा इतिहास किती खडतर आहे हे पूस्तक वाचताना समजून घेता येते. सुरुवातीच्या काळात पाळी येते म्हणून महिला डॉक्टर कशा मानसिकदृष्ट्या अस्थिर असतात आणि म्हणून त्या कशा रुग्णांचा जीव वाचवू शकत नाही असेही दावे पुरुष डॉक्टरांनी केले होते.

वैद्यकिय क्षेत्रात महिला येऊ नये यासाठीही त्या काळातील पुरूष डॉक्टरांनी खालच्या पातळीवर घसरून प्रयत्न केले. हे दावे लेखिका पुस्तकात पुराव्यानिशी खोडून काढते. तसेच महिला या क्षेत्रात याव्या यासाठी महिला चळवळीने दिलेला लढा आणि इतिहास या पूस्तकात मांडला आहे.

अतिशय सोप्या भाषेत लिहिलेल्या या पुस्तकात अभ्यासपूर्ण संशोधन, अनुभव, रोजच्या जगण्यातील उदारहणे देत अनेक ठिकाणी आकडेवारीसह मांडणी केली आहे. हे पुस्तक फक्त महिलांनीच नाही, तर समानता हे मुल्य मान्य असलेल्या आणि अधिक चांगलं आयुष्य जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने वाचायलाच हवे.

प्रियंका सोनवणे

Updated : 24 March 2025 6:50 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top