Home > News > विनीता सिंग: स्वप्नांचा पाठपुरावा करत गाठले यश

विनीता सिंग: स्वप्नांचा पाठपुरावा करत गाठले यश

विनीता सिंग: स्वप्नांचा पाठपुरावा करत गाठले यश
X

गुजरातमधील आनंद येथे जन्मलेल्या विनिता सिंगचं बालपण भावनगर येथे तिच्या आजीसोबत गेलं. तिचे वडील डॉक्टर होते आणि त्यांना AIIMS, दिल्ली येथे नोकरीची संधी मिळाल्याने संपूर्ण कुटुंब दिल्लीला स्थलांतरित झालं. विनीता आपल्या आई-वडिलांची एकुलती एक मुलगी असल्याने तिच्यावर लहानपणापासूनच विशेष लक्ष दिलं जात होतं. मात्र, नवीन शहरात मित्र बनवण्याची सुरुवातीची अडचण तिने स्वतःच्या हिमतीवर पार केली आणि आपला स्वतंत्र मित्रपरिवार तयार केला.

लहान वयातच तिने व्यावसायिक दृष्टिकोन आत्मसात केला. अवघ्या दहा वर्षांची असताना, तिने आणि तिच्या मैत्रिणीने मिळून एक छोटंसं मासिक सुरू केलं. त्या घरोघरी जाऊन अवघ्या तीन रुपयांत हे मासिक विकत असत, मात्र तरीही लोकांना ते महाग वाटायचं. याच अनुभवातून तिला पैशाचं महत्त्व आणि व्यवसायातील आव्हानांची पहिली झलक मिळाली.

विनीता अभ्यासात अत्यंत हुशार होती. तिने IIT मद्रासमधून अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर IIM अहमदाबादमधून व्यवस्थापनाचं शिक्षण घेतलं. IIT मध्ये असताना ती कमी जोखमीच्या स्पर्धांमध्ये भाग घ्यायची, तर IIM च्या प्लेसमेंटमध्ये तिने इन्व्हेस्टमेंट बँकिंग क्षेत्र निवडलं, कारण तिला तो तुलनेने सोपा मार्ग वाटला. मात्र, तिचं स्वप्न मोठं होतं – स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं!


वयाच्या 23 व्या वर्षी तिला IIM प्लेसमेंटमध्ये वार्षिक 1 कोटी रुपयांच्या पॅकेजची ऑफर मिळाली, मात्र तिने ती नाकारली आणि स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला तिने महिलांसाठी ऑनलाईन लिंजरी ब्रँड सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण अनुभव आणि गुंतवणूकदारांचा पाठिंबा नसल्याने तिला 10-12 वेळा नकार मिळाला. यामुळे निराश न होता, तिने स्वतःच्या पैशावर बिझनेस सुरू करण्याचा निर्णय घेतला.

तिने बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन सेवा पुरवणारी कंपनी सुरू केली आणि पुढील पाच वर्षे हा व्यवसाय सांभाळला. त्या काळात तिने स्वतःसाठी केवळ 10,000 रुपयांचा पगार घेतला. हळूहळू कंपनीचा वार्षिक महसूल 4-5 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. मात्र, मोठ्या प्रमाणावर विस्तार होण्याची मर्यादा असल्याने तिने हा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला.

2012 मध्ये विनीता आणि तिचे पती कौशिक मुखर्जी यांनी Sugar Cosmetics ची स्थापना केली. मेकअप मार्केटमध्ये महागड्या ब्रँड्सचा दबदबा असल्याचं तिला जाणवलं. म्हणूनच, उच्च प्रतीच्या आणि परवडणाऱ्या मेकअप उत्पादनांवर लक्ष केंद्रित करत तिने Sugar ब्रँड उभारला. ग्राहकांच्या गरजा समजून घेत, कमी मार्केटिंग खर्चातही Sugar लोकप्रिय होत गेला आणि काही वर्षांतच मोठा ब्रँड बनला.

आज Sugar Cosmetics ची नेटवर्थ 4000 कोटी रुपये आहे. विनीता Shark Tank India च्या चौथ्या सीझनमध्ये जज म्हणून देखील झळकते. एकेकाळी 5000 रुपये भाड्याच्या 1RK घरात राहणारी विनीता आता मुंबईच्या पॉश Powai भागात आलिशान अपार्टमेंटमध्ये राहते. तिच्या मेहनतीच्या आणि चिकाटीच्या जोरावर तिने स्वतःचं यश घडवलं आहे. तिची ही यशोगाथा तरुणांना प्रेरणा देणारी आहे आणि नवउद्योजकांसाठी दिशादर्शक ठरत आहे.

Updated : 22 March 2025 6:03 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top