रात्री सव्वा दोन वाजता विनायक मेटे यांचा देवेंद्र फडणवीसांना मेसेज
X
शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं रविवारी पहाटे झालेल्या अपघातानंतर उपचारादरम्यान निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांनी शेवटचा मेसेज मला केला होता अशी माहिती दिली.
विधानपरिषदेचे माजी आमदार विनायक मेटे यांचं रविवारी पहाटे अपघाती निधन झाले. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी एमजीएम रुग्णालयात दाखल झाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटे यांच्या निधनावर प्रतिक्रीया दिली.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आजचा दिवस हा दुःखद घटनेने सुरू झाला. सकाळी साडेसहाच्या सुमारास अपघाताची माहिती समजली. मात्र त्याची गंभीरता समजली नाही. त्यामुळे मी माहिती घेत होतो. त्यानंतर विनायक मेटे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली. यावेळी मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. तर यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत, असंही फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, अतिशय गरीबीतून वर येईन स्वतःच्या पायावर उभं राहिलेलं नेतृत्व म्हणजे विनायक मेटे. तसंच विनायक मेटे हे मराठा आरक्षणासाठी झगडणारे नेते होते. आम्ही १५ वर्ष खूप जवळून काम केलं. तसंच रात्री सव्वा दोन वाजता विनायक मेटे यांचा मेसेज आला. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की, मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी लावलेल्या बैठकीसाठी मी येत आहे. मी फोन लावला त्यावेळी तुम्ही विमान प्रवासात होता. उद्या सकाळी मी तुमच्याशी बोलतो, असा मेसेज मी आज सकाळी वाचला, असंही फडणवीस म्हणाले.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, विनायक मेटे यांच्या निधनाने मराठा समाजाचे अपरिमित हानी झाली आहे. त्यांच्या परिवाराशी मी बोललो आहे. त्यांच्या पुर्ण कुटूंबाच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. त्यामुळे शिवसंग्राम संघटेच्या पाठीशीही आम्ही उभे आहोत, असंही फडणवीस म्हणाले.
विनायक मेटे यांचे पार्थिव शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनाही अंत्यदर्शन घेता यावे, यासाठी ठेवण्याची मागणी आहे. मात्र त्यांचे कुटूंबिय दाखल झाले की, त्यानुसार नियोजन करण्यात येईल.