मतदारसंघच करणार विधवा प्रथा बंदी गावांचा पुढाकार..
X
हेरवाडे ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंदीचा निर्णय घेतला आणि तो सबंध राज्याला मार्गदर्शक ठरलाय. यानंतर अनेक गावांनी हा निर्णय घेत एक नव्या क्रांतीला सुरूवात केली होती. या सगळ्या प्रबोधनात्मक निर्णयाची दखल राज्य सरकारने घेतली आणि संपुर्ण राज्यात हा निर्णय घेतला. पण लागू करण्यासाठी प्रत्येक गावामध्ये वैचारीक क्रांती करावी लागेल. आणि याच साठी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने खडकवासला मतदारसंघातील अनेक गावांनी गुरूवारी विधवा प्रथा बंदीचा क्रांतीकारी निर्णय घेतला.
आज एकविसाव्या शतकात वावरत असताना विज्ञानवादी व प्रगतिशील समाज म्हणून आपण वाटचाल करत आहोत. मात्र आजही समाजात विधवा प्रथेसारख्या अनिष्ट प्रथा प्रचलित असल्याचे आढळून आले येते. पतीच्या निधनावेळी पतीचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसुत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढली जाणे यासारख्या कुप्रथांचे समाजात पालन केले जाते.
महाराष्ट्र शासनाने व महराष्ट्र राज्य महिला आयोगाने या अनिष्ट विधवा प्रथेचे निर्मूलन होण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींना आवाहन केले होते त्याला महाराष्ट्रभरातून सकारात्मक असा प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने आणि मार्गदर्शनाखाली पुण्यातील खडकवासला मतदारसंघातील धायरीसह तब्बल २९ ग्रामपंचायतींनी व ४ प्रभागातील नागरिकांनी उद्या दि.९ जून रोजी एकाच दिवशी हा ठराव मंजूर करण्याचे ठरवले आहे. अशा पद्धतीने खडकवासला मतदारसंघ हा महाराष्ट्रातील पहिला मतदारसंघ असेल जो १०० टक्के विधवा प्रथा बंदी करणारा मतदारसंघ ठरेल. मध्यतंरी रुपाली चाकणकर यांच्या काकांचे निधन झाल्यानंतर आपल्या काकूचे कुंकू न पुसता, मंगळसुत्र न काढता विधवा प्रथा बंदीची सुरुवात आपल्या घरापासून केली होती. आता याच्याही पुढे जात आपला संपूर्ण मतदारसंघ विधवा प्रथामुक्त त्या करत आहेत.
यावेळी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रद्धा जोशी-शर्मा, पुण्याचे जिल्हाधिकारी श्री.राजेश देशमुख, मनपा आयुक्त श्री.विक्रम कुमार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.आयुष प्रसाद, पोलीस आयुक्त श्री.अमिताभ गुप्ता, पोलीस अधीक्षक श्री.अभिनव देशमुख हे उपस्थित राहिले होते.