Home > News > ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचं निधन

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचं निधन

ज्येष्ठ मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचं निधन
X

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण यांचं मुंबईत निधन झालं आहे. ह्दयविकाराच्या झटक्यामुळे त्यांचं अकस्मात निधन झालं. मृत्यूसमयी त्या ६१ वर्षांच्या होत्या. मुंबईत राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रेमा किरण यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अशोक सराफ यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजले होते. चित्रपटच नव्हे, तर अनेक मालिकांमधूनही त्यांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. अर्धांगी, धूमधडाका, दे दणादण, गडबड घोटाळा, सौभाग्यवती सरपंच, माहेरचा आहेर अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या.

८०,९० च्या दशकात प्रेमा किरण यांना अनेक चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका निभावल्या होत्या. दे दणादण, धुमधडाका चित्रपटातील त्यांची आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती. चित्रपटातील त्यांची गाणी आजही तितकीच प्रसिद्ध आहे. प्रेमा किरण यांनी उतावळा नवरा, थरकाप या चित्रपटांची निर्मितीदेखील केली होती. फक्त मराठीच नाही तर गुजराती, भोजपुरी, अवधी, बंजारा या भाषेतील चित्रपटांमध्ये त्यांनी काम करत महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. 'धुम धडाका', 'पागलपन', 'अर्जुन देवा', 'कुंकू झाले वैरी' आणि 'लग्नाची वरात लंडनच्या घरात' अशा गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. 'धुम धडाका' चित्रपटातील त्यांनी साकारलेली 'अंबाक्का' प्रचंड गाजली होती.

प्रेमा किरण या अभिनेत्रीच नाही, तर निर्मात्या देखील होत्या. 1989 मध्ये आलेल्या 'उतावळा नवरा' या चित्रपटाची निर्मिती त्यांनीच केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली होती. नुकतेच त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे देखील निधन झाले होते. यामुळे त्या एकट्या पडल्या होत्या.

मी तीन वेळा पडले आणि चित्रपट हिट झाला.

झी मराठीवरील 'हे तर काहीच नाही' या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी अभिनेत्री प्रेमा किरण (Prema Kiran ) यांनी हजेरी लावली होती. या मंचावर महेश कोठारे यांची निर्मिती असलेल्या 'दे दणादण' या चित्रपटाविषयीचा एक किस्सा त्यांनी प्रेक्षकांसोबत शेअर केला होता. त्यांचा हा किस्सा सोशल मीडियावर चांगला चर्चेत आला होता.

प्रेमा किरण हा किस्सा सांगताना म्हणाल्या, 'पोलीस वाल्या सायकल वाल्या' हे गाणं शुट करताना महेश कोठारे यांनी आम्हाला दुपारच्या आत हे गाणं शुट करायचंय , अशी ताकीद दिली होती. त्यानंतर या गाण्याचं शूटिंग देखील सुरु झालं. मात्र, शूटिंग सुरू असताना लक्ष्मीकांत बेर्डे यांना सायकल नीट चालवता येत नव्हती. अवघी दोन दोन पावलं पुढे जाऊन लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रेमा यांना खाली पाडलं. या सीनमध्ये प्रेमा किरण या सायकलीवरून चक्क तीन वेळा पडल्या होत्या. चित्रपटाचा हा किस्सा सांगताना त्या गमतीने म्हणाल्या, 'मी तीनवेळा पडले म्हणून सिनेमा हिट झाला', हे ऐकताच प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला होता. त्यांचा हा किस्सा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत होता.

Updated : 1 May 2022 9:58 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top