पाकिस्तानी विद्यार्थीनींसाठी अमेरिकेत 'मलाला युसूफझाई स्कॉलरशीप ऍक्ट'
X
अमेरिका आणि पाकिस्तान यांचं मैत्रीचं नातं संपूर्ण जगाला परिचीत आहे. यावेळी मात्र अमेरिकेने एक पाकिस्तानसाठी एक आदर्श निर्णय घेतला आहे. अमेरिकेत शिकायची इच्छा असलेल्या पाकिस्तानी विद्यार्थीनींसाठी अमेरिकन काँग्रेसने 'मलाला युसूफझाई स्कॉलरशीप ऍक्ट' लागू केला आहे.
पाकिस्तान सारख्या घराघरात हिंसा आणि दहशतवाद वसलेल्या देशात तालिबान ह्या अतिरेकी संघटनेने पाकिस्तानच्या वायव्य भागात मुलींच्या शिक्षणावर बंदी घातली होती. ह्या बंदीविरुद्ध मलालाने लढा चालवला होता. तसेच ह्या भागात महिलांच्या मानवी हक्कांच्या चाललेली पायमल्ली देखील तिने जगासमोर आणण्याचे प्रयत्न केले.
९ ऑक्टोबर २०१२ रोजी शाळेत जात असताना तालिबान अतिरेक्यांनी मलालावर तीन गोळ्या झाडल्या. ह्या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मलालाला उपचारांसाठी इंग्लंडच्या बर्मिंगहॅम शहरामध्ये हलवण्यात आले. मलालावरील ह्या हल्ल्याची जगभर तीव्र नोंद घेतली गेली. अनेक देशांनी ह्या घटनेबद्दल निषेध व्यक्त केला. ह्या जीवघेण्या हल्ल्यामधून बचावलेल्या मलालाने स्त्री शिक्षणासाठी आपला लढा चालू ठेवण्याचे जाहीर केले.
मलालाने स्त्री शिक्षणासाठी दाखवलेल्या या धाडसाबद्दल तिला २०१४ मध्ये शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला आहे. स्त्री शिक्षण आणि स्त्री हक्काचा लढा मलालाने वयाच्या १४ व्या वर्षापासून सुरू केला. अमेरिकन काँग्रेसने पाकिस्तान सारख्या दहशतवादी राष्ट्रातील महिलांना त्यांचे हक्क मिळावे आणि त्यांना शिक्षण घेता यावं यासाठी घेतलेल्या या निर्णयाचं स्वागतच करायला हवं!