विधवा महिलांनीही वटपौर्णिमा साजरी करावी तृप्ती देसाईचं आवाहन
X
मंगळवारी १४ जुन २०२२ ला राज्यभरात मोठ्या उत्साहात महिलांनी वडाच्या झाडाची पुजा करून वटपौर्णिमा साजरी केली. या सर्व महिलांसाठी भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी एक सल्ला दिला आहे. त्यांनी तसा एक व्हीडीओच प्रसिध्द केला आहे.
त्यांनी सुरूवातीलाच महिलांना वृक्षारोपणाचा संदेश दिला आहे. वटपौर्णिमा साजरी करणाऱ्या महिलांनी वडाच्या झाडाच्या तोडलेल्या फांद्यांची पूजा करण्यापेक्षा वडाचं एक झाड लावून त्याचं कायम पालन पोषण करण्याचा संकल्प करायला हवा.
त्या नंतर त्यांनी जशी आपल्याला सत्यवानाची सावित्री समजली तशी जोतिबाची सावित्रीही समजली आहे आणि म्हणूनच सत्यवानाच्या सावित्रीचा जयघोष फक्त वटपौर्णिमेच्या दिवशी केला जातो आणि ज्योतिबाची सावित्री प्रत्येकाच्या हृदयात आहे आणि म्हणूनच मुली शिकत आहेत, प्रगती करत आहेत, प्रत्येक क्षेत्रात महिला उच्च पदांवर काम करत आहेत असं म्हणत महिला वर्गाचं कौतुक केलं.
याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी विधवा महिलांना जो संदेश दिला तो कौतुकास्पद आहे. ज्या विधवा महिलांची आपल्या नवऱ्यासाठी वटपौर्णिमेचे व्रत आणि पूजा करण्याची इच्छा आहे त्यांनी पुढाकार घेऊन वटपौर्णिमा साजरी करावी, कारण हा सण महिलांचा आहे फक्त सुवासिनी म्हणून इतरांशी भेदभाव करणाऱ्यांचा नाही असं आवाहन तृप्ती देसाईंनी समस्त विधवा महिला वर्गाला केलं.