ठाकरे सरकारमधल्या रणरागिणी ग्राउंड झिरोवर...
X
राज्यात गेल्या तीन दिवसांपसून पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे. अशावेळी पूरग्रस्तांना सरकारच्या मदतीची गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबतच राज्यातील अनेक मंत्री स्वता: घटनास्थळी जाऊन आढावा घेतांना पाहायला मिळत आहे. यात ठाकरे सरकारमधील महिला मंत्री सुद्धा मागे नाहीत. राज्यातील तिन्ही महिला मंत्री ग्राउंड झिरोवर जाऊन पूरग्रस्त भागातील लोकांच्या समस्या समजवून घेतांना पाहायला मिळत आहे.
राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर,शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि उद्योग, क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे या तिन्ही महिला मंत्री थेट ग्राउंड झिरोवर जाऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी करत आहे. तसेच लोकांना धीर देत स्थनिक प्रशासनाला सूचना देताना पाहायला मिळत आहे.
मंत्री यशोमती ठाकूर ह्या आपल्या मतदारसंघात झालेल्या नुकसान भागाची पाहणी करताना पाहायला मिळाल्या. ठाकूर यांनी अमरावती तालुक्यातील देवरी, देवरा (शहिद), ब्राम्हणवाडा भगत, शिराळा आदी अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी प्रत्येक गावात झालेल्या हानीचा प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला व ग्रामस्थांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या. घरांच्या नुकसानीच्या पंचनाम्याच्या प्रक्रियेनुसार तातडीने त्या नोंदी घ्याव्यात, पंचनामे करताना सविस्तर व प्रत्येक नुकसानीची नोंद घ्यावी, एकही नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश सुद्धा स्थानिक प्रशासनाला दिल्यात.
गेल्या आठवड्यात चेंबूरच्या भारतनगर परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली, यावेळी मंत्री वर्षा गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन स्थानिक रहिवाशांसोबत संवाद साधून घटनेची माहिती घेतली व महानगरपालिका आणि एनडीआरएफकडून सुरू असलेल्या बचावकार्याचा आढावा घेतला. तसेच ज्या नागरिकांची घरे बाधित झाली आहेत व ज्यांची घरे राहण्यायोग्य नाहीत अशा नागरिकांच्या स्थलांतराबाबत जिल्हाधिकारी उपनगर यांच्याकडे चर्चा केली.
पावसाचा सर्वाधिक फटका बसलेल्या कोकणातील जनजीवन कोलमडून गेलं. रायगड जिल्ह्यातील अनेक भागात बिकट परिस्थितीत निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदिती तटकरे ग्राउंड झिरोवर जाऊन लोकांच्या मदतीला धावून आल्याच्या पाहायला मिळत आहे. गेली तीन दिवसांपासून त्या सतत घटनास्थळी जाऊन नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेत आहे.
लोकांचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन आजही बदलेला दिसत नाही, मात्र असे असताना महिला सुद्धा आपले कर्तव्य चांगल्या पद्धतीने पाडू शकतात मग क्षेत्र कोणतेही असू द्यात हे पुन्हा एकदा पाहायला मिळाले. त्यामुळे ठाकरे सरकारमधील या रणरागिणींची कामगिरी कौतुकास्पद आहे.