'किचन'मधली 'मिसेस' आणि मोकाटलेले 'मिस्टर्स'
X
काही दिवसांपूर्वी फेसबुकवर 'मिसेस' या सिनेमावर टीका करणाऱ्या काही पोस्ट्स, मीम्स पाहिल्या. त्यांचा साधारण सूर ‘दोन माणसांचा स्वयंपाक करण्यात या बाईला इतका त्रास होण्याचं कारणच काय?’ असा होता. 2021मध्ये आलेल्या आणि मला अतिशय आवडलेल्या, किंबहुना सुन्न करून गेलेल्या 'द ग्रेट इंडियन किचन' या मल्याळी सिनेमाचा हा हिंदी रीमेक पाहायचा होताच, त्याला अशा अपरिपक्व पोस्टी, मीम्समुळे हवा मिळाली. मूळ गोष्ट माहिती होती, त्यामुळे, तद्दन प्रचारकी सिनेमे बघून भावनांचे उमाळे फुटणारे प्रेक्षक, यातल्या नायिकेची मौन घुसमट, अखेर तिचा झालेला उद्रेक का समजून घेत नाहीत, का ती फक्त बाई आहे, म्हणून तिच्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात, कदाचित आपल्या घरची परिस्थितीही याहून वेगळी नाही, याची टोचणी त्यांच्या मनाला लागते, म्हणून या सगळ्यावरच फुली मारतात का, असे अनेक प्रश्न पडले. पण, 'मिसेस' बघण्याआधी आठवणींवर बसलेली धूळ झटकण्यासाठी 'द ग्रेट इंडियन किचन' पुन्हा पाहायचं ठरवलं आणि जो बेबी यांचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाचा प्रभाव जवळपास चार वर्षांनी पाहिल्यानंतरही किंचितसाही कमी झालेला नाही, हे लख्ख जाणवलं. पहिल्यांदा पाहताना सुटून गेलेल्या अनेक गोष्टीही लक्षात आल्या.
'बाई'च्या उष्ट्या खरकट्या जगण्याची अंगावर येणारी गोष्ट
'द ग्रेट इंडियन किचन'मधली सगळ्यात लक्षात राहण्यासारखी बाब म्हणजे यातल्या पात्रांना नावंच नाहीयेत. निमिषा सजयननं साकारलेल्या व्यक्तिरेखेसारखंच - जिला आपल्या सोयीसाठी आपण 'बाई' असं म्हणू - जिणं जगणाऱ्या असंख्य बायकांची ही कहाणी त्यातल्या पात्रांच्या अनामपणामुळे जास्त अंगावर येते. सुरुवातीच्या गाण्यातूनच हा सिनेमा आपलं म्हणणं ठामपणे मांडायला, भूमिका घ्यायला सुरुवात करतो. सिनेमात वारंवार दिसणारे खाण्याचे पदार्थ, त्यांच्यावर स्थिर न राहता हलता असलेला कॅमेरा यामुळे ते बघून तोंडाला पाणी वगैरे कुठेही सुटत नाही, उलट ते वातावरण हळूहळू डोक्यात जायला लागतं. मुळात ही 'बाई' स्वयंपाकात तरबेज आहे. त्यामुळे या जोडप्याचं लग्न, त्यांचा 'हनीमून पीरिएड' फार पटकन संपतो आणि तिचा स्वयंपाकघरातला वावर, किंबहुना त्याच चार भिंतीत कोंडलं जाण्याची तिची भावना फार तीव्रतेने सिनेमाच्या सुरुवातीपासूनच जाणवायला लागते. विशेषतः, घरातल्या पुरुषांनी जेवणाच्या टेबलावर केलेली घाण, सांडलेलं अन्न, बाजूला काढलेलं खरकटं, त्यातच बसून जेवायची 'बाई'च्या सासूच्या, माफ करा, 'पोस्टग्रॅज्युएट' सासूच्या अंगवळणी पडलेली सवय, पाट्या-वरवंट्याऐवजी मिक्सर, चुलीऐवजी कुकर किंवा हातांऐवजी वॉशिंग मशीन, सकाळचं अन्न रात्री खाणं अशा, तिला सोयीच्या होतील त्या कोणत्याही गोष्टी करू न देणं यामुळे प्रेक्षक म्हणून आपण संतापायला लागतो. मग सुरू होते ती थेट कुंचबणा. 'बाई'ला नोकरी न करू देणं, मासिक पाळीच्या वेळी बाहेर बसायला लावणं, हे कमी म्हणून की काय, त्यामागचे अतिशय हिडीस, अश्मयुगीन तर्क तिला समजावू पाहणं, सेक्स करताना आपल्याला वेदना होतात, हे सांगून फोरप्लेची मागणी करणाऱ्या 'बाई'ची नवऱ्यानं केलेली अक्षम्य हेटाळणी यामुळे आपलीही तगमग होते. या सगळ्याला सणसणीत पार्श्वभूमी दिग्दर्शक देतो, ती सबरीमला मंदिराची दारं स्त्रियांसाठी खुली करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची. एकीकडे 'बाई'ला पाळी आली म्हणून तिनं पलंगावर न झोपता खाली सतरंजीवर झोपावं, असं संतापून सांगणारी आतेसासू, दुसरीकडे सबरीमलाच्या निकालाचं विश्लेषण करणाऱ्या, या निर्णयाला स्त्रीच्या स्वातंत्र्याचं दार म्हणणाऱ्या एका कार्यकर्तीच्या घरावर होणारा हल्ला, 'बाई'नं शेअर केलेला तिचा व्हिडिओ डिलीट करावा म्हणून तिच्यावर आजूबाजूच्या धर्ममार्तंडांनी टाकलेला दबाव यामुळे या गोष्टी घराच्या चार भिंतीत न राहता सामाजित पातळीवर जातात. यात आणखी दुर्गंधी भर घालत राहतं स्वयंपाकघरातल्या सिंकमध्ये अडकणारं खरकटं, त्याची गळणारी पाईप, अनेकदा सांगूनही या बाबतीत ढिम्म असलेला 'बाई'चा नवरा, बादलीत साचलेलं ते पाणी, त्याने भिजलेलं पोतं, साचलेला कचरा बाहेर टाकताना आणि वारंवार हात धुताना 'बाई'ची होणारी घुसमट आणि या सगळ्याची अंधारी, कोंदट, उदास, मळकट रंगसंगती, प्रकाशयोजना आणि वातावरण. 'बाई'ची छोटी मैत्रीण जानकी आणि स्वतः चहा करून बायकोला पाजणारा मित्र या दिलाशाच्या झुळकाही येतात आणि जातात. फारसे संवाद, पार्श्वसंगीत नसलेल्या या चित्रपटाचा क्लायमॅक्स म्हणूनच इतका प्रभावी ठरतो, प्रेक्षकांच्याही कोंदटलेल्या मनाला एक सणसणीत थप्पड लगावतो आणि म्हणूनच, तोपर्यंतचं जिणं फाट्यावर मारून प्रकाशाकडे निघालेली 'बाई', एकीकडे चे गव्हेरा आणि त्याला लागूनच सबरीमलाच्या निर्णयाच्या विरोधात धरणं देऊन बसलेले 'भक्तगण', त्यातही बायका आणखी अधोरेखित होतात. दरम्यान, 'पुरुष' मात्र दुसरं लग्न करून दुसऱ्या 'बाई'ची वाट लावायला सज्ज झालेला आहे आणि आपली 'बाई' तिचं स्वप्न पूर्ण करायच्या दिशेने पाऊल टाकते आहे. इतका काळ मुकेपणाने किंवा दबक्या आवाजात बोलणाऱ्या 'बाई'चा माहेरघरी बहिणीवर चढलेला आवाज कानात दणदणत राहतो. 'बाई'चा दावा स्वयंपाकघरातल्या कामाविरुद्ध नाही, तर स्त्रीला तेवढ्यापुरतंच मर्यादित ठेवू पाहणाऱ्या, त्यासाठी कोणत्याही थराला जाणाऱ्या पुरुषी (पुरुषांच्या नव्हे!) मानसिकतेविरुद्ध, प्रथा-परंपरांच्या लोभस कोंदणात स्त्रीच्या शोषणाची, तिच्यावरच्या अन्यायाची गाथा लिहिणाऱ्या समाजाविरुद्ध आहे.
'बॉलिवुडी' स्टाईलचा ठीकठाक रीमेक
'मिसेस' हा मुदलात 'द ग्रेट इंडियन किचन'चा रीमेक असला, तरी त्याला बॉलिवुडीपणाची ठळक झालर आहे. मूळ सिनेमातली सावळी, स्थूल, मळकट रंगाचे कपडे घालणारी, अतिशय कमी बोलणारी, प्रगल्भ 'बाई' जाऊन तिच्या जागी गोरीपान, चकचकीत, हलक्या रंगाचे सुंदर कपडे घालणारी, नेलपॉलिश लावलेली, किनऱ्या आवाजात बडबड करणारी, काहीशी पोरकट 'रिचा' येते. अनेक सूक्ष्म गोष्टींकडे फक्त इशारा करून त्या समजून घेण्याची जबाबदारी प्रेक्षकांवर सोडून देण्याच्या मूळ सिनेमाच्या पिंडाऐवजी इथं प्रत्येक गोष्ट समजावून सांगण्याचा, संवादातून अधोरेखित करण्याचा अट्टहास दिसतो. मुळात, पात्रांना नावं आल्यामुळे ही गोष्ट 'रिचा' आणि 'दिवाकर'ची होऊन जाते, त्यातलं व्यापक अवकाश थोडं मागे पडतं. पडद्यावर पुनःपुन्हा दिसणारे अन्नपदार्थ बघून वैताग न येता चटकन एखादा तुकडा तोंडात टाकायची इच्छा होते. सूर्यप्रकाशात न्हालेलं स्वयंपाकघर, हलक्या रंगांचा वापर यामुळे समोर काहीही वाईट सुरू असलं, तरी त्यात एक सकारात्मकता जाणवत राहते. मूळ सिनेमात शिक्षक असलेला रिचाचा नवरा यात स्त्रीरोगतज्ज्ञ का आहे, बाईचं शरीर, त्यातल्या उलथापालथी इतक्या जवळून बघणारा हा माणूस आपल्या बायकोच्या मासिक पाळीबद्दल इतका संकुचित का, यामागचा तर्क कळत नाही. रिचाची नाचाची आवड, नवेनवे पदार्थ बनवण्याची तिची इच्छा, धडपड अधोरेखित करून मूळ सिनेमाच्या गाभ्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलंय की काय, असं वाटून जातं. मुळात दिग्दर्शकाला एक वेगळीच गोष्ट सांगायची होती, पण त्याच्यावर 'द ग्रेट इंडियन किचन'चा रीमेक करणं लादलं गेलंय, यामुळे वैतागून वेगळा सिनेमा करता करता मूळ सिनेमातले काही प्रसंगं, दृष्यं, पात्रं मध्येच ठिगळासारखी जोडली आहेत की काय, असा प्रश्न पडतो. यातली पात्रं सिनेमाचा सगळा संदेश प्रेक्षकांना ताटात वाढून ते तो पचवतात की नाही, याचीही जबाबदारी त्यांचीच असल्यासारखी स्पष्टीकरणं देतात. धर्मसंस्थेला, त्यातल्या पाखंडाला, त्याचा उदोउदो करणाऱ्या धर्माच्या ठेकेदारांना शिंगावर घेण्याची मूळ सिनेमानं दाखवलेली हिंमत 'मिसेस'मध्ये बोथट झालेली दिसते आणि म्हणूनच, इतर अनेक तरल प्रतीकांप्रमाणेच सिनेमाचा क्लायमॅक्सही चांगलाच फसतो. यातूनही तग धरून रिचाच्या भूमिकेत सान्या मल्होत्रा, निशांत दहियानं साकारलेला दिवाकर, सासऱ्यांच्या भूमिकेत कंवलजीत सिंह यांच्या ताकदीच्या अभिनयामुळे हा सिनेमा बघणेबल होतो खरा, पण 'द ग्रेट इंडियन किचन'चा रीमेक करून मूळ सिनेमाशी तुलना होण्याची जोखीम न पत्करता स्वतंत्र सिनेमा केला असता, तर तो आणखी सुसह्य झाला असता, असं वाटत राहतं. मात्र, मूळ सिनेमातल्या आत्म्याशी 'मिसेस'ची असलेली बांधिलकी यातूनही डोकावते, जाणवते आणि पोहोचते.
‘स्त्रीसंसाधनां’वरच्या अंकुशाची कहाणी
'द ग्रेट इंडियन किचन' आणि 'मिसेस' या दोन सिनेमांमधली तुलना, चित्रपटाच्या भाषेतून बलस्थानं आणि कमकुवत दुवे याच्या पलीकडे जाऊन, हे दोन्ही सिनेमे बघताना ज्येष्ठ साहित्यिक तारा भवाळकर यांचं 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातलं अध्यक्षीय भाषण, त्यात स्त्रीच्या जगण्यावर त्यांनी केलेलं भाष्य यावर त्यांनी केलेलं भाष्य मला वारंवार आठवत राहिलं. निर्मिणारा आणि उपभोगणारा या दोन वर्गांमधला संघर्ष आणि या रस्सीखेचीत निर्मितीचं प्रतीक असलेल्या स्त्रीला पुरुषसत्ताक समाजाने सातत्याने दिलेलं दुय्यम स्थान, स्त्रीपासून मिळणाऱ्या संसाधनांवरची या पुरुषसत्तेची एकहाती मालकी, स्त्रियांच्या आत असलेली या अन्यायाची जाणीव, त्याचं आविष्करण, अनादि काळापासून चालत आलेल्या या प्रथापरंपरा, त्यातल्या दुव्यांमधून उभं राहणारं स्त्रीजीवनाचं विदारकच राहिलेलं चित्र, विटाळ ही संकल्पना, त्यावरून होणारं चर्वितचर्वण, स्त्रीने कुंकू लावून स्वतःवरचा पुरुषाचा अधिकार अधोरेखित करावा, या अट्टहासापायी दिले जाणारे तथाकथित वैज्ञानिक तर्क असे, ताराबाईंच्या भाषणात आलेले मुद्दे पडद्यावर उमटताना मला दिसत राहिले आणि त्यांनी मला अस्वस्थ करून सोडलं.
'मिसेस' चित्रपटाच्या विषयामुळे सोशल मीडियावर उमटलेल्या प्रतिक्रियाही मला याच मानसिकतेचं प्रतीक वाटतात. यातल्या अनेक पोस्ट्स, मीम्सनी यातल्या बाईला थेट कामचुकार, कुचकामी, आळशी, कुटुंबव्यवस्थेला आणि पर्यायाने समाजव्यवस्थेला सुरुंग लावणारी ठरवून टाकलं. एका मीममध्ये तर यातल्या नायिकेची तुलना विमानात सेवा देणाऱ्या स्त्रीशी केली होती. तर दुसरीकडे, घरची कामं करायची ‘शरम’ वाटणारी नायिका आणि बांधकामांवर डोक्यावरून वाळू आणि सिमेंट वाहून नेणारी मजूर स्त्री यांना एकाच पारड्यात ठेवलं होतं. यात गुंतलेल्या आर्थिक, सामाजिक, व्यावसायिक बाजू लक्षात येऊ नयेत, इतके आपण माठ नक्कीच नाही. यामागे एकच स्पष्ट उद्देश आहे- स्त्रीचा आवाज, तिची सोय, स्वतःचं म्हणणं मांडण्याची तिची धडपड, तिची स्वप्नं, तिच्या महत्त्वाकांक्षा दाबून टाकणं, त्यांना किरकोळीत काढणं, तिच्या भावनिक उद्रेकांची कुचेष्टा करणं, अशा स्त्रियांना खलनायिका ठरवणं आणि त्यांना संपवून टाकणं. यात चांगली बाजू अशी, की अशा पोस्ट्स आणि मीम्सवर अनेक स्त्रियांनी सडेतोड उत्तरं दिल्याचं, हिरीरीनं वाद घातल्याचं, समांतर पोस्ट्स, मीम्स तयार केल्याचंही सोशल मीडियावर दिसलं. विशेषतः, क्लायमॅक्सच्या सीनमधली रिचाची कृती अनेकींच्या पसंतीला पडल्याचं जाणवलं, कारण त्यातून त्यांची निराशा, मनातली खदखद यांना वाट मिळाली. हा सीन अनेक स्त्रियांना ‘मोस्ट सॅटिस्फाइंग’ वाटला. मात्र, असं म्हणणाऱ्यांपैकी किती स्त्रिया स्वतः ते करण्याची हिंमत दाखवू शकतील, किती शहाण्या होऊन गोष्टी त्या टोकाला जाण्याआधीच थांबवतील आणि किती, किती मूकपणाने सहन करत राहतील, याचा अंदाज लावणं अवघड नाही, आणि ही जाणीव त्रासदायक आहे.
‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः’ हे तत्त्वज्ञान झाडणाऱ्या आपल्या समाजाला अजूनही नारी ही फक्त स्वयंपाकघरातच रमायला हवी आहे, तिथं तिनं अन्नपूर्णा असावं आणि पलंगावर रती, या अपेक्षा आपल्या आत, कल्पनेपेक्षाही फार आत रुजलेल्या आहेत, घराबाहेर पडली, तरी तिनं घरातली कामं करून जावं आणि परत येऊन पुन्हा पदर खोचून कामाला लागावं, अशी अपेक्षा आपला समाज आजही करतो, हे अशा सिनेमांच्या, त्यातून झडणाऱ्या चर्चांच्या, त्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून पुनःपुन्हा दिसून येतं. त्यामुळे, ‘असे सिनेमे तयार करायची गरज ज्या दिवशी संपेल, तो सोनियाचा दिनू’, ही अवास्तव अपेक्षा आपणही सोडून द्यायला हवी. उलट, असे सिनेमे अधिकाधिक तयार व्हावेत, अधिकाधिक प्रेक्षकांनी ते बघावेत, त्यावर चर्चा करावी आणि स्त्रीवर खलनायिकेचा शिक्का न मारता तिची भूमिका समजून घेतील, किमान तसा प्रयत्न करतील, असे प्रेक्षक यातून कालांतराने निर्माण व्हावेत, ही आशा, अपेक्षा आणि इच्छा.
- अंकिता आपटे.