ED ची कारवाई, घरात सापडला पैशाचा ढीग
X
पश्चिम बंगालचे उद्योगमंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने (ED ) काल शुक्रवारी छापा टाकला. या कारवाईत मुखर्जी यांच्या घरातून 20 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. हा पैसा शाळा सेवा आयोग (एसएससी) घोटाळ्यात कमावल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे.
13 ठिकाणी कारवाई
पार्थ चटर्जी, शिक्षण राज्यमंत्री परेश सी अधिकारी, आमदार माणिक भट्टाचार्य यांच्या घरासह 13 ठिकाणी ईडीच्या पथकाने छापे टाकले. मात्र, त्यांच्याजवळ रोख रक्कम सापडली नाही. ईडी सध्या पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोग आणि पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळातील भरती घोटाळ्याची चौकशी करत आहे.
एसएससी भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीचे अधिकारी काल शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून पार्थ चॅटर्जीची चौकशी करत आहेत. एसएससीच्या माध्यमातून शिक्षकांच्या नियुक्तीसाठी कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा घोटाळा झाला तेव्हा पार्थ चॅटर्जी हे शिक्षणमंत्री होते.
पार्थ चॅटर्जीवर बेकायदेशीरपणे नोकऱ्या दिल्याचा आरोप
चॅटर्जी यांच्या विरोधात कलकत्ता उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली असून, त्यांच्या 10 जवळच्या सहकाऱ्यांना बेकायदेशीरपणे नोकरी दिल्याचा आरोप आहे. हे लोक चॅटर्जी यांच्या सुरक्षा रक्षकाचे नातेवाईक असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात कोर्टात या प्रकरणाची सुनावणी होण्याची शक्यता आहे.