राज्यात लॉकडाऊनच्या प्रदीर्घ कालावधीनंतर तमाशाचं पुनरागमन!
कोरोना कालखंडानंतर लोककला, तमाशा व लोककलावंतांची मांदियाळी
X
कोव्हिड १९ मुळे दोन वर्षांपुर्वी देशभरात लॉकडाऊन लागला आणि अनेक उद्योग धंद्यांवर गदा आली होती. सगळ्यात आधी या लॉकडाऊनचा परिणाम जर कोणत्या क्षेत्रावर झाला असेल तर तो मनोरंजन क्षेत्रावर झाला. अशात लोककलावंतांवर तर उपासमारीची वेळ आली होती. पण आता या लोककलावंतांचा रोजगार देखील प्रदीर्घ कालावधीनंतर सुरू झाला आहे. अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये तमाशाचे पडघम पुन्हा वाजले आहेत.
कोरोनाच्या कालखंडानंतर लोकनाट्य तमाशा मंडळ व लोककलावंतांच्या कार्यक्रमाने रसिक प्रेक्षक व लोककलाकारांची मांदियाळी पाहायला मिळाली. पाथर्डी तालुक्यातील मिडसांगवी येथे लोककलामंच मनोरंजनाच्या लोकनाट्य तमाशा मंडळाचे दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कलाकारांनी सादर केलेल्या लोकनाट्य मनोरंजनाचे कार्यक्रम व नाटक यामुळे रसिक प्रेक्षक व कलाकारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी गावकऱ्यांची व युवकांची संख्या लक्षणीय होती. यावेळी लोकनाट्य तमाशा कलावंत संगीता महाडिक पुणेकर यांनी लोककलाकारांच्या व्यथा व्यक्त केल्याच शिवाय रसिकांचे आभारही मानले.