सुप्रिया सुळेंनी मानले प्रकाश आंबेडकरांचे आभार
X
लोकसभा निवडणूकीच्या या काळात देशाची स्थिती ही अत्यंत चिंताजनक आहे. सत्ताधाऱ्यांकडून
सर्वोच्च न्यायालय, आयकर विभाग, ईडी आणि सीबीआय यांसारख्या यंत्रणांचा गैरवापर होत असून निवडणूकीची प्रक्रिया यावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित उपस्थित केले आहेत. देशामध्ये आणीबाणी लागू नसताना तशा पध्दतीची परिस्थिती निर्माण झाल्याची चर्चा सध्या समाजात दबक्या आवाजात सुरू आहे, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं आहे.
दरम्यान, सुळे असंही म्हणाल्या की, ही बाब देशातल्या सामान्य नागरीकांसाठी अत्यंत वेदनादायी व चिंताजनक असून देशाच्या लोकशाहीसाठी हा घातक विषय आहे. दडपशाहीच्या दिशेने पावले टाकली जात आहेत का? अशी काळजी सरकारकडून सातत्याने घेण्यात येणाऱ्या काही निर्णयातून होत आहे. देशाच्या संविधानासाठी ही बाब चिंताजनक असून आम्ही त्याच्यासाठी लढाई लढत आहोत, असं मत सुळे यांनी स्पष्ट केलं आहे.
अॅड. प्रकाश आंबेडकरांचे मानले आभार :
बारामती लोकसभा मतदारसंघातून शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला, त्याबद्दल सुप्रिया सुळे यांनी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे जाहीर आभार मानले.
राज्यात महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये उमेदवारीबाबत चर्चा अद्याप सुरूच आहेत. देशातील हुकूमशाही हद्दपार करण्यासाठीची ही लढाई असून त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत, असंही सुळे म्हणाल्या.