धर्मसंसदेतील प्रक्षोभक भाषणासंदर्भातील याचिकेवर होणार सुनावणी...
X
उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये गेल्या महिन्यात झालेल्या धर्मसंसदेतील प्रक्षोभक भाषणं करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे. प्रक्षोभक भाषणं करणाऱ्या व्यक्तींविरोधात FIR दाखल करुनही कारवाई झालेली नाही, हे वास्तव ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीश एन.व्ही.रमना यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी याचिकांवर सुनावणी घेण्याची तयारी दाखवली.
डिसेंबर महिन्या १७ ते १९ तारखे दरम्यान हरिद्वारमध्ये धर्मसंसद पार पडली होती. यावेळी तिथे झालेल्या भाषणांमध्ये काहींनी मुस्लिम धर्मियांविरोधात अत्यंत प्रक्षोभक भाषण केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्यानंतर देशभरात याविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. याच प्रकरणात कपिल सिब्बल यांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सुनावणी घेतली जाईल, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसात दोन ठिकाणी झालेल्या धर्मसंसदमध्ये काही साधूंनी अत्यंत प्रक्षोभक भाषणं केली. एवढेच नाही कालिचरण दास या भोंदू साधूने तर रायपूरमधील धर्मसंसदेत महात्मा गांधी यांच्या हत्येचे समर्थन केले. तसेच गांधीजींचा मारेकरी नथुराम गोडेसेचा उदोउदो केला होता. त्यानंतर कालीचरण दासवर गुन्हा दाखल झाला आणि त्याला अटकही झाली. आता सुप्रीम कोर्ट या याचिकेवर काय आदेश देतं ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.