हिजाब परिधान केलेल्या विद्यार्थिनींना आता या विद्यापिठानं नाकारला प्रवेश
X
गेल्या काही दिवसांपासून निवळलेल्या हिजाब वादाने आता पुन्हा डोकं वर काढलं आहे. कर्नाटकातील मंगळूरू विद्यापिठाने विद्यार्थिनिंच्या एका गटाला हिजाब परिधान केल्यामुळे विद्यापिठात प्रवेश नाकरला आहे.
शुक्रवारी मंगळूरु विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी गणवेश घालण्याची सक्ती तसेच वर्गात हिजाब घालण्यास मनाई असल्याची सूचना जारी केली होती. पण दुसऱ्याच दिवशी शनिवारी विद्यार्थिनींचा एक गट हिजाब परिधान करून विद्यापीठ संकुलात आला. विद्यापिठाकडून या विद्यार्थिनींना परत पाठविण्यात आले. शनिवारी सकाळी रेकॉर्ड केलेल्या एका व्हिडीओमध्ये महाविद्यालयाच्या प्राचार्या अनुसया राय या हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिनींना गणवेशाच्या नियमांबाबत समजावून सांगत असल्याचे दिसत आहेत.
सीडीसीने म्हणजेच महाविद्यालय विकास परिषदेने आयोजित केलेल्या कुलगुरू, प्राचार्य आणि विद्यापीठ सिंडिकेटच्या बैठकीत कर्नाटक उच्च न्यायालयाने १५ मार्च रोजी हिजाबबाबत दिलेल्या निकालाची अंमलबजावणी करण्यात यावी असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार वर्गात हिजाब परिधान करण्यास मनाई केली जावी. म्हणून शनिवारी विद्यापीठाने हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिनींना माघारी पाठविले. ज्या विद्यार्थिनींना हिजाब घालायचा आहे, त्यांची नावे हिजाबला मनाई नसलेल्या महाविद्यालयांत नोंदविली जातील अशी माहिती कुलगुरू सुब्रमण्या यदापदीथया यांनी दिली.
विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासावर लक्ष द्यावे
हा प्रश्न सिंडिकेटच्या बैठकीत विचारविनिमयातून सोडविण्यात आला आहे. सर्वांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे. विद्यार्थ्यांनी वादापासून दूर राहून अभ्यासाकडे लक्ष द्यावे अशी प्रतिक्रीया कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली आहे.