ठरलं! दहावी आणि बारावीच्या परिक्षा ऑफलाईनच होणार… राज्य शिक्षण महामंडळाची घोषणा!
X
राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाईन पध्दतीनेच होणार आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे.
दहावीची परीक्षा यंदा 15 मार्चपासून तर बारावीच्या परीक्षा 4 मार्चपासून घेण्यात येणार आहेत. यंदा पहिल्यांदाच दहावी आणि बारावीच्या परीक्षा 15 दिवस उशिराने घेण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास वेळ मिळावा आणि शिक्षकांना अध्यापनासाठी वेळ मिळावा म्हणून बोर्डाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही परीक्षा विद्यार्थी शिकत असलेल्या शाळा आणि महाविद्यालयांमध्येच होणार आहेत. विद्यार्थ्यांना दुसऱ्या शाळेत जाऊन परीक्षा देण्याची वेळ येणार नसल्याने शाळा महाविद्यालयावरील नियोजनाचा ताण देखील कमी होणार आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अर्ध्या तासाची वेळही वाढवून देण्याचा मोठा निर्णय बोर्डाकडून घेण्यात आला आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषद घेऊन इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांची घोषणा केली. तसेच इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा ऑनलाईन न होता ऑफलाईनच होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे.
कशी होणार लेखी परिक्षा?
75 टक्के अभ्यासक्रमावर दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा होणार आहेत. म्हणजे यंदा इयत्ता दहावी आणि बारावीचा 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे, असं शरद गोसावी यांनी सांगितलं.
मिळणार अधिक वेळ
इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी अधिकचा वेळ वाढवून दिला आहे. या दोन्ही परीक्षेच्या 40 ते 60 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटं अधिक वेळ देण्यात येणार आहे. तसेच 70, 80 ते 100 गुणांसाठीच्या परीक्षेसाठी अर्धा तास देण्यात येणार आहे.
पेपर किती वाजता सुरू होणार?
इयत्ता दहावी आणि बारावीचे सकाळच्या सत्रातील पेपर दरवर्षी सकाळी 11 वाजता सुरू होतात. यंदा हे पेपर सकाळी 10 वाजून 30 मिनिटाने सुरू करण्यात येणार आहेत. प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी विद्यार्थ्यांना 10 मिनिटे दिली जातात. ही दहा मिनिटे यंदाही दिली जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष 10 वाजून 20 मिनिटाने सकाळच्या सत्रात आणि दुपारच्या सत्रात 2 वाजून 50 मिनिटाने प्रश्नपत्रिका मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थी वाढीव वेळेनुसार परीक्षा देऊ शकणार आहेत. कोरोनामुळे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत होते. प्रत्यक्ष शाळेत हजर राहू न शकल्याने गेल्या दोन वर्षात विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाला आहे. त्यामुळे ही वेळ वाढवून दिली आहे. असं शरद गोसावी यांनी सांगितलं आहे.
प्रात्यक्षिक परीक्षेचं काय?
यंदा बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्चवर असणार आहे. प्रात्यक्षिक अभ्यासक्रमाच्या 40 टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होणार आहे. तसे निकष तज्ज्ञांना विचारून करण्यात आल्याचं गोसावी यांनी सांगितलंय. दहावीचे अंतर्गत मूल्यमापन किंवा प्रात्यक्षिक 40 टक्के अभ्यासक्रमावरच असेल.
बाहेरचा परीक्षक नसणार
प्रात्यक्षिक परीक्षेसाठी 40 टक्के अभ्यासक्रम केला तरी अंतर्गत परीक्षक आणि बहिस्थ: परीक्षक त्याच शाळेतील ठेवण्यात येणार आहेत. सुपरवायझर आला तर विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर दडपण येऊ शकते. म्हणून बहिस्थ: परीक्षक नेमण्यात येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.