Home > News > पवारांची सून एवढीच 'सुनेत्रा पवारां'ची ओळख नाही,तर....

पवारांची सून एवढीच 'सुनेत्रा पवारां'ची ओळख नाही,तर....

पवारांची सून एवढीच सुनेत्रा पवारांची ओळख नाही,तर....
X

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी किंवा पवार कुटुंबाची सून एवढीच सुनेत्रा पवार यांची ओळख नसून,पतीच्या राजकारणात साथ आणि कुटुंबातील जवाबदारीबरोबर सामाजिक उपक्रमात त्यांनी केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे. एवढंच नाही तर त्यांनी राबवलेल्या अनेक उफक्रमांमुळे आज हजारो महिलांच्या हातांना रोजगार मिळाला आहे. सुनेत्रा पवार यांचा आज वाढदिवस असून, त्यानिमित्ताने त्यांच्या सामजिक कामांचा आढावा घेणारा हा रिपोर्ट....

राजकारणात सक्रिय असण्याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्राताई पवार या जोडप्याने विविध सामाजिक आणि नाविन्यर्पूण उपक्रमांमध्ये ही आपला ठसा उमटविला आहे. बारामती ( Baramati ) चा कायापालट करण्यात पवार कुटुंबियांचा सिंहाचा वाटा आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. या दोन्ही पती-पत्नीने बारामती हायटेक टेक्‍स्टाईल पार्क, काटेवाडी इकोव्हिलेज, एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडीया, विद्या प्रतिष्ठान आणि मार्ट यासारख्या संस्था बारामतीमध्ये स्थापन केल्या. या संस्थांमार्फत त्यांनी अनेक उल्लेखनीय उपक्रम राबविले. साधी राहणी आणि समाजातील सर्व घटकांना सोबत घेण्याच्या अजितदादा आणि सुनेत्राताईंच्या स्वभावाभामुळे हे सर्व शक्य झाले. लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर तातडीने निर्णय घेण्याची त्यांची हातोटी आहे. त्यामुळे थोड्याच काळात त्यांनी सर्व संस्थांमधील कर्मचारी वर्गामध्येही आपुलकीचे स्थान मिळविले.

बारामती हायटेक टेक्‍सटाईल पार्क

बीएचटीपी च्या निर्मितीतून Baramati आणि आसपासच्या गावांतील तीन हजारांहून अधिक महिलांना रोजगार मिळाला. आज त्या महिलांच्या सशक्तीकरणाचे श्रेय हे अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांना जाते. २००७ साली या प्रकल्पाला मंजूरी मिळाल्यानंतर एमआयडीसी औद्योगिक श्रेत्रातील तब्बल ६० एकर जागेवर बीएचटीपी उभे राहिले. बीएचटीपी हे देशातील सर्वोत्तम टेक्‍स्टाईल पार्क्सपैकी एक आहे. खेड्यापाड्यातील महिलांना आर्थिकदृष्टया स्वावलंबी बनविण्या सोबतच त्यांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देण्याचेही काम बीएचटीपीच्या माध्यमातून केले जाते.

एन्व्हॉर्यमेंटल फोरमची स्थापना २०१० साली अजित पवार आणि सुनेत्राताई पवार यांनी केली. बारामती तालुका हा दुष्काळप्रवण भाग म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या भागात पाण्याचे दुर्भिक्ष आढळते. पाण्याची गरज भागविण्यासाठी येथे टँकरचा वापर केला जायचा. या भागाला टॅंकरमुक्त करण्यासाठी जलसंधारणाची महत्वपूर्ण चळवळ उभारण्याचे कार्य अजितदादा आणि सुनेत्राताईंनी केले. हे कार्य दीर्घकालीन होते. मात्र आता त्याचे सकारात्मक परिणाम या भागात दिसून येत आहेत. या अंतर्गत बारामती तालुक्‍यातील दहा गावांमध्ये ओढा सरळीकरण, खोलीकरणाची कामे करण्यात आली. तसेच चार गावामध्ये तलावातील गाळ काढण्याचे काम करण्यात आले.

अजित पवार आणि सुनेत्राताई यांनी सुरू केलेल्या या फोरमच्या माध्यमातून वर्षभर विद्यार्थी आणि बारामतीकरांसाठी पर्यावरणाबाबत जागृती करणारे अनेक उपक्रम राबविले जातात. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा यासाठी राज्य आणि जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शने ही आयोजित केली जातात. तसेच फोरमतर्फे दरवर्षी अनेक उल्लेखनीय उपक्रम आयोजित केले जातात. ज्यामध्ये मृद्गंध स्पर्धा, प्रतिबिंब अंतर्गत होणारे विविध उपक्रम, वसुंधरा पुरस्कार आणि बारामती आयकॉन पुरस्कार यांचा मुख्यतः समावेश होतो. तसेच बारामतीमध्ये 'नो प्लास्टीक डे', इको फ्रेंडली गणेशोत्सव यांसारख्या अभिनव योजनाही अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी राबविल्या. जलस्त्रोतांचे जतन करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टींग आणि विहीर पुर्नभरणाचेही कामही एन्व्हॉर्यमेंटल फोरमच्या माध्यमातून करण्यात आले आहे. फोरमच्या स्थापनेपासून अजित पवार आणि सुनेत्राताई या संस्थेच्या माध्यमातून समाजाच्या चांगल्यासाठी काम करीत आहेत.

सामाजिक कार्याबरोबरच भविष्याचा विचारही अजित दादा आणि सुनेत्राताईंनी केला. ह्या विचारातूनच विद्या प्रतिष्ठान ह्या शैक्षणिक संकुलाची निर्मिती करण्यात आली. आज विद्या प्रतिष्ठानमध्ये २५ हजारांहून जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना आणि खासकरून मुलींना शिक्षण मिळावे. ज्यामुळे बारामती आणि आसपासच्या गावांना शिक्षणाचे दालन खुले झाले. अनेक गरजू विद्यार्थ्यांना मदत म्हणून विद्या प्रतिष्ठानतर्फे शिष्यवृत्ती देण्यात येते.

काटेवाडी हे पवार कुटुंबियांचे गाव आहे. आज ह्या छोट्याशा गावाचा कायापालट झाला आहे. बारामतीमधील कृषी क्षेत्रातील योगदानामुळे काटेवाडीला महाराष्ट्रातील पहिले 'इको-व्हिलेज' म्हणून ओळखले जाते. याचे सर्व श्रेय पवार कुटुंबियांना जाते. या गावाचे रुपडे पालटण्यात सुनेत्रा पवार यांनी बरेच योगदान दिले आहे. त्यामुळे 'इको-व्हिलेज' काटेवाडी हे आज जिल्हा किंवा राज्यच नव्हे तर देशपातळीवर ही नावाजले जाते. सार्वजनिक स्वच्छतेत ही काटेवाडी गावाने आपला ठसा उमटविला. या गावातील प्रत्येक घरात शौचालय आहे. त्यामुळेच 'निर्मलग्राम' योजनेअंतर्गत राष्ट्रपतींच्या हस्ते काटेवाडीचा गौरव करण्यात आला.

( सौजन्य:ajitpawarmumbai.wordpress.com )

Updated : 18 Oct 2021 12:38 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top