माध्यमांवर अब्रुनुकसानीचा दावा करणाऱ्या शिल्पा शेट्टीच्या वकिलांना कोर्टाने फटकारले
X
अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा पती राज कुंद्रा याला अश्लील फिल्म रॅकेट प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान आपल्या पतीच्या अटकेनंतर आपल्याबद्दल मीडियामध्ये खोट्या आणि बदनामीकारक बातम्या प्रसिद्ध होत असल्याचा आरोप शिल्पा शेट्टीने केला आहे. तसेच या बातम्या रोखाव्या आणि माध्यमांनी नुकसानभरपाई पोटी २५ कोटी रुपये द्यावे अशी मागणी शिल्पा शेट्टीने हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केली आहे.
पण या याचिकेवरील सुनावणी दरम्यान हायकोर्टाने काही मुलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत. मीडियाला शिल्पा शेट्टी बद्दल फक्त चांगले लिहावे किंवा काहीच लिहू नये, असे तुमचे म्हणणे आहे का...तुम्ही मीडियाच्या संपादकीय धोरणांवर नियंत्रण आणण्यास सांगत आहात, याचा अर्थ माध्यमांच्या स्वातंत्र्यावर हा घाला आहे, अशा शब्दात शिल्पा शेट्टीच्या वकिलांना कोर्टाने फटकारले. एड. वीरेंद्र सराफ आणि एड. अभिनव चंद्रचूड यांनी शिल्पा शेट्टीची बाजू मांडली.
शिल्पा शेट्टीचा २५ कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा
शिल्पा शेट्टीने केवळ NDTV, The New Indian Express, India TV, Free Press Journal यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलेला नाही, तर बार अँड बेंच या न्यायालयीन वृत्तांकन करणाऱ्या पोर्टलच्या माहितीनुसार Facebook , Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही खटला दाखल केला आहे. या माध्यमांनी माफी मागावी, तसेच बदनामी करणाऱ्या बातम्या मागे घ्याव्या आणि २५ कोटी रुपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शिल्पा शेट्टीने आपल्या याचिकेत केली आहे.
शिल्पा शेट्टीच्या मागणीनुसार माध्यमांच्या वृत्तांकनावर निर्बंध आणणे म्हणजे माध्यमांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्यासारखे आहे या शब्दात कोर्टाने फटकारले आहे.