साकीनाका बलात्कार प्रकरणात आरोपी दोषी..शिक्षेसाठी होणार युक्तीवाद
X
सप्टेंबर २०२१ मध्ये मुंबईतील साकीनाका इथे घडलेल्या बलात्कार प्रकरणात सोमवारी आरोपीला दोषी ठरवण्यात आले आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात साकीनाका येथे महिलेवर बलात्कार आणि नंतर तिच्यावर अमानुषपणे अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. हत्येस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाप्रकरणी दिंडोशी सत्र न्यायालयाने मोहन चौहान (४५) या आरोपीला त्याच्यावर असलेल्या सर्व आरोपांमध्ये दोषी ठरवलं. त्याच्या शिक्षेवर बुधवारी युक्तीवाद होणार आहे.
गेल्या वर्षी सर्वत्र गणेशोत्सवाची धामधुम सुरू असताना अचाननक १० सप्टेंबरच्या मध्यरात्री घडलेल्या या घटनेने मुंबईसह संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. काही दिवसांपूर्वीच या प्रकरणामध्ये दोन्ही पक्षांकडून युक्तिवाद पूर्ण झाला होता पण न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. दिंडोशी न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश एच. सी शेंडे यांनी सोमवारी मोहन चौहान याच्यावरील सगळ्या आरोपांमध्ये त्याला दोषी ठरवले. तसेच शिक्षेवरील युक्तिवाद बुधवारी ऐकणार असल्याचे स्पष्ट केले.
बलात्कार आणि खुनाच्या आरोपासह चौहानवर महाराष्ट्र पोलीस कायदा आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (ऍट्रॉसिटी) आरोप ठेवण्यात आले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या १८ दिवसांत चौहानवर मुंबई पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त ज्योत्स्ना रासम, पोलीस निरीक्षक दत्तात्रय चुमे, सहायक पोलीस निरीक्षक महेश सांगळे यांनी केला होता. या प्रकरणी ३७ साक्षीदार तपासण्यात आहे. घटनास्थळाजवळील पुठ्ठ्यांच्या कंपनीतील सुरक्षा रक्षक हा या प्रकरणातील मुख्य साक्षीदार होता. शिवाय घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेले चित्रीकरणही या प्रकरणातील मुख्य पुरावा होता.
नेमकं प्रकरण काय?
साकीनाका परिसरात खैरानी मार्गावर आरोपी आणि महिला यांच्यात १० सप्टेंबरच्या रात्री वाद झाले. या वादांमध्ये आरोपीने पिडीत महिलेला मरहाण केली. या मारहाणीत महिला बेशुध्द झाली. तिला त्याच अवस्थेत आरोपीने खेचत नजीकच उभ्या असलेल्या टेम्पो मध्ये नेले. तिच्यावर बलात्कार केला शिवाय लैंगिक अत्याचारही केले. शेजारी असलेल्या पुठ्ठयांच्या कंपनीच्या सुरक्षा रक्षकाने पोलिसांना फोन करून माहिती दिली. तत्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन पिडीतेला राजावाडी रूग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. परंतू दुसऱ्याच दिवशी उपचारांदरम्यान पिडीतेचं निधन झालं.