गावाला जोडणारा मुख्य रस्ता नसल्याने सहन कराव्या लागतायत मरण यातना..
X
एका बाजूला देशात आझादीचा अमृत महोत्सव साजरा होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र ग्रामीण भागात आजही मूलभूत सुविधांचा बोजवारा उडालेला पाहायला मिळतो. गावाला जोडणारा मुख्य रस्ता नसल्याने वंदना बुधर या प्रसूती झालेल्या महिलेला मरण यातना सहन कराव्या लागल्या आहेत .
मोखाडा तालुक्यातील मर्कटवाडी येथील गरोदर माता वंदना बुधर यांनी 2 जुळ्या बाळांना जन्म दिला . मात्र दुर्दैवाने दोन्ही मुलं दगावली . वंदनाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होते . 108 ला कॉल केला मात्र गावाला जोडणारा रस्ता नसल्याने 108 ही पोहचू शकली नाही . वंदनाच्या कुटुंबीयांनी डोलीचा आधार घेऊन त्यांना रुग्णालयात दाखल केलं. मुख्यरस्ता गाठण्यासाठी वंदना यांना डोलीत घेऊन कुटुंबियांना 3 किलोमीटरची पायपीट करावी लागली. त्यातही पायवाट जीवघेणी असल्याने वंदना यांच्या कुटुंबियांना मोठी कसरत करावी लागली . हा व्हिडीओ सध्या समोर आला असून ग्रामीण भागातील दाहक वास्तव पुन्हा एकदा उघड झालं आहे.