अखेर...एलजीबीटीक्यु बाबत अपमानकारक माहिती वैद्यकीय अभ्यासक्रमातून वगळली जाणार...
एलजीबीटीक्यु बाबत अपमानकारक माहिती वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पुस्तकात आल्याच समोर आले होते. कौमार्य चाचणी व एलजीबीटीक्यु बाबत अवैज्ञानिक व चुकीची माहिती असल्याचे समोर आल्या नंतर आता ही भेदभावजनक माहिती वैद्यकीय अभ्यासक्रमातून वगळण्यात येणार आहे. याबाबत राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने LGBTQ विषयी अवैज्ञानिक, अपमानकारक आणि भेदभाव करणाऱ्या माहितीचा उल्लेख अभ्यासक्रमामध्ये समावेश करू नये असे आदेश वैद्यकीय संस्थांना दिले आहेत.
X
समलैंगिकता अनैसर्गिक आहे. तसेच हा मानसिक आजार आहे. अश्या प्रकारची चुकीची व अवैज्ञानिक माहिती वैद्यकीय अभ्यासक्रमात आढळून आली होती. अशाप्रकारे खोटी व अपमान करणारी माहिती विद्यार्थ्यांना शिकवली जात असल्याचे लक्षात येताच ही माहिती वैद्यकीय अभ्यासक्रमातून आता वगळण्यात येणार आहे. या संदर्भात राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं (NMC) एका समितीची सुद्धा स्थापना केली आहे.
अशाप्रकारे अपमानकारक व भेदभावजनक माहिती असल्याचे समोर आल्यानंतर राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने यासंदर्भात वैद्यकीय संस्थांना या माहितीचा उल्लेख असलेल्या पुस्तकांचा अभ्यासक्रमात समावेश करू नये असे आदेश देखील दिले आहेत. लैंगिकतेबाबत वैद्यकीय माहिती, तक्रारी, लक्षणे, तपासणी, निष्कर्ष कसे नोंदवावेत याबाबत MBBS किंवा पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकवत असताना LGBTQ विषयी अपमानकारक किंवा भेदभाव करणारी माहिती देऊ नये अशा सूचना देखील वैद्यकीय संस्था आणि महाविद्यालयांना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात सुधारित अभ्यासक्रम तयार करण्यासाठी एका समिती सुद्धा गठण करण्यात आली आहे. या समितीमध्ये चार सदस्यांची नेमणूक केली जाणार आहे.