' रॅम्प वॉक ' हे यंदाच्या ' एकल महिलां 'च्या सहलीचे आकर्षण ठरले
X
राष्ट्र सेवा दल,मालवणी, काचपाडा, मालाड आणि सफल विकास वेलफेअर सोसायटीच्या वतीने 'व्हॅलेन्टाईन डे ' निमित्ताने एकल महिलांची एक दिवसीय सहलीचे आयोजन शनिवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी मनोरी मधील 'कॉर्नर बीच रिसॉर्ट ' येथे केले होते.
मार्वेहुन बोटीने प्रवास करत एकल महिला मनोरीत दाखल झाल्या. सानेगुरुजी यांच्या ' खरा तो एकची धर्म ' या गाण्याने दानिश या अंध कार्यकर्त्याने कार्यक्रमाची सुरुवात केली.70 वर्षाच्या आजी सोबत 25 वर्षाच्या समीरा सिद्दीकीने 'व्हेलेंटाइन केक ' कापला.
सर्व महिलांचे गट पाडून त्यांचे टीम लीडर नेमून मनोरी बीचवर पहिला खेळ खेळला गेला.आपल्या गटातील महिलांची ओळख आणि माहिती घेऊन एक दुसऱ्याशी मानवी संबंध घट्ट करण्याचा संदेश देण्याचा प्रयत्न या खेळातून केला.यावेळी म्युझिक प्रशिक्षक सुमन बरडेवा यांनी गिटार वाजवून तर दानिश याने गाणी गावून एकल महिलांचे मनोरंजन केले.यात 25 ते 70 वर्षीय एकल महिलांनी ठेका धरला तर काही एकल महिला उत्स्फूर्तपणे गाणे गात नृत्य करू लागल्या. समुद्र किनाऱ्यावर सुरू असलेला या आनंद सोहळ्याचा मनसोक्त आनंद या महिलांनी लुटला.
दुपारच्या जेवणानंतर एकल आई ते एकल आज्यांनी स्विमिंग पूल मध्ये उतरून पोहण्याचा आनंद घेतला यातील काही महिलांनी तर पहिल्यांदाच स्विमिंग पूल पाहिले होते तसेच स्विमिंग नंतर अंताक्षरी कार्यक्रमात महिला रमून गेल्या. अनिता खरात या महिलेने त्यांच्या जीवन संघर्षाचे अनुभव कथन करत एकल महिलांना संघर्षासाठी प्रेरणा दिली. प्रदीप खरात यांनी ही यावेळी मार्गदर्शन केले. फुगा आणि टाचणीचा खेळ खेळून सकारात्मक दृष्टिकोण समजावुन घेतला.मग आला तो सर्वात गंमतीचा आणि खेळ एकल आजी ते एकल आई यांनी रॅम्प वॉक (Ramp walk ) करून सर्वच उपस्थितांचे मने जिंकली. या एकल महिलांनी असे कार्यक्रम सतत व्हावे आणि अधिक महिलांना यात सामावून घ्यावे असे मत व्यक्त केले. त्यानंतर एकल महिलांनी चहा बिस्कीटचा आस्वाद घेत आपआपल्या घरची वाट धरली. या सहलीत कल्याण, वरळी, बोरिवली, गोरेगाव, मालाड पूर्व,पश्चिमे आदी भागांतून जवळ पास 80 महिला सहभागी झाल्या होत्या.यावेळी मनोज परमार, मेरी चेट्टी, संगीता आपटे आणि अनिता खरात यांना सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. राष्ट्र सेवा दल, मालवणी, काचपाडा आणि सफल विकास वेलफेअर सोसायटीच्या वैशाली महाडिक निसार अली, मेरी चेट्टी, मनोज परमार, कृष्णा वाघमारे, राजेश रागपसरे, शुभम मिश्रा, नमिता मिश्रा, प्रकाश जैस्वार आणि इतर कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महत्वाचे योगदान दिले.