१ हजार पर्यावरणपूरक कागदी बाप्पा घडविण्याची संकल्पपूर्ती
X
यंदाचा गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याबाबत जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी तब्बल १ हजार पर्यावरणपूरक कागदी बाप्पा घडविण्याचा संकल्प आर्ट पुणे फाऊंडेशनने यांनी केला होता. प्रियंवदा व संजीव पवार यांनी आपल्या छंदातून पर्यावरणपूरक संदेश देत जनजागृतीचा वसा जपत केलेल्या या संकल्पाची पूर्तता केलेल्या आर्ट पुणे फाऊंडेशनच्या अनोख्या आणि नावीन्यपूर्ण उपक्रमाची चर्चा सध्या पुण्यात सुरू आहे. विशेष म्हणजे पुणेकरांनी आपल्या कुटुंबासह या उपक्रमात सहभागी होत या १ हजार पर्यावरणपूरक कागदी बाप्पा घडविण्यात मोलाचा वाटा उचलेला आहे. या उपक्रमाला पुणे हँडमेड पेपर्स, पुणे महापालिका, सह्याद्री इंडस्ट्रीज, सुहाना आणि कॅम्लीन यांचे सहकार्य लाभले.
गेली १८ वर्षापासून प्रियंवदा या कला क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांची पुण्यात प्रसिद्ध आर्ट गॅलरीदेखील आहे. प्रियंवदा व संजीव पवार यांनी आपल्या छंदातून पर्यावरणपूरक संदेश देत जनजागृतीचा वसा जपत 'रंगवा तुमचा कागदी बाप्पा' हा इको-फ्रेंडली गणेशोत्सवासाठी विशेष असा उपक्रम हाती घेतला होता. ८०% कापूस-कागदाचा लगदा आणि २०% शाडू माती अशा विशिष्ट मिश्रणापासून तयार केलेल्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती पुणे हँडमेड पेपर्सच्यावतीने बनविण्यात आल्या होत्या.
या उपक्रमाबद्दल सांगताना प्रियंवदा व संजीव पवार यांनी म्हटले की, पर्यावरणाच्या रक्षणाबाबत प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव वाढत आहे. याच उद्देशाने खारीचा वाटा उचलत यंदाचा गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याबाबत जनतेमध्ये जागरुकता निर्माण करण्याचा एक यशस्वी प्रयोग केला. या उपक्रमाला जनतेनेही मोलाची साथ दिली. यावेळी १ हजारचा संकल्पपूर्ण केल्या पुढच्यावर्षी १० हजारचा पल्ला गाठायचा असल्याचे सांगितले.