रायगड मधील आदिवासी विद्यार्थ्यांच्या ई-मॅमल या अभिनव उपक्रमाची चर्चा!
रायगड जिल्ह्यातील पाटणूस येथील कुंडलिका विद्यालय ही शाळा ई-मॅमल (e-mammal) प्रकल्प राबवणारी रायगड जिल्यातील एकमेव शाळा आहे. जिल्ह्यातील एकमेव ई-मॅमल प्रकल्पाची यशस्वी घोडदौड सुरू झाली असून आदिवासी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे हे विशेष.
X
या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जंगलात ट्रॅप कॅमेरा लावून परिसरातील विविध वन्यजीवांची माहितीघेत आहेत. त्या बरोबरच पर्यावरण संवर्धन व जनजागृती केली जात आहे. प्रकल्पात आदिवासी विद्यार्थ्यांचा पुढाकार सर्वाधिक आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून वन्यजीवांवर आधारित निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उत्साह व कुतूहलात आणखी भर पडत आहे.
हा प्रकल्प राबविणारे शिक्षक राम मुंढे यांनी सांगितले की आता पर्यंत अनेक वन्यजीव ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हे वन्यजीव वेगवेगळ्या प्रकारचे असल्याने विद्यार्थी, पालक आणि स्थानिक लोक यांना देखील या वन्यजीवांविषयी विशेष आवड निर्माण झाली आहे. सर्वात विशेष महत्वाची बाब म्हणजे ट्रॅप कॅमेऱ्यात बिबटे देखील कैद झाले आहेत.
बिबट्यांच्या वावर पाटणुसच्या अवतीभोवती असला तरी त्यांनी आता पर्यंत कोणावरही हल्ला नाही केला याला कारण म्हणजे बिबट्यांना मुबलक प्रमाणात असलेले खाद्य आहे. शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 90% आहे. या विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी त्याच प्रमाणे वन्यजीवांची गोडी लागावी हा प्रकल्प 2021 पासून पुन्हा सुरू करण्यात आला आहे.









काय आहे हा ई-मॅमल (e-mammal) प्रकल्प
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (BNHS मुंबई), सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूण आणि ICICI बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प कुंडलिका विद्यालयात सुरू आहे. जंगलात जाऊन विद्यार्थ्यांकडून ट्रॅप कॅमेरा लावायचा आणि परिसरामधील वन्यजीवांचा अभ्यास करायचा असा हा प्रकल्प आहे. मागील 3 वर्षा पूर्वी 'e-mammal' प्रकल्प कुंडलिका विद्यालयात सुरू झाला होता. हा प्रकल्प एक वर्षासाठी होता परंतु तो पुढे चालू ठेवण्यास सांगितल्या मुळे सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना घेऊन हा प्रकल्प राबविण्यात येत होता. परंतु या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने प्रकल्प सुरू ठेवणे अवघड होते तरी देखील शाळेतील आदिवासी विद्यार्थ्यांची सतत विचारणा असल्याने शाळा सुरू होण्याच्या अगोदर प्रकल्प सुरू करण्याचा विचार केला आणि शाळेतील विद्यार्थ्यांसोबत जंगलात जाऊन ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला असे शिक्षक राम मुंढे यांनी सांगितले.
"जंगलात जाऊन कॅमेरे लावायला खूप मजा येते. कॅमेरात वेगवेगळे प्राणी टिपले जातात. त्यांची माहिती आम्हाला मिळते. आणि आम्ही ती इतर मुले आणि घरातल्यांना सांगतो."
- संघर्ष जगताप, विद्यार्थी, कुंडलिका विद्यालय, पाटणूस