राहायला जागा नसल्याने महिला रिक्षा टेम्पोमध्येच क्वारंटाईन
आणखी 14 दिवसानंतर त्या रिक्षा टेम्पोतून बाहेर येणार आहेत.
X
औरंगाबाद - हलाखीची परिस्थिती असल्याने कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर महिलेला रिक्षामध्ये विलगीकरण करून उपचार घेण्याची वेळ आली आहे. औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील ही घटना आहे.
गंगापूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये राहणाऱ्या एका महिलेने घशात खवखव व अंगदुखी असल्याने गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी केली. त्यानंतर 15 मे रोजी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी त्यांना कोरोना सेंटरमध्ये विलगीकरण होण्यास सांगितले. मात्र, या महिलेने घरीच क्वारंटाईन होण्याचा पर्याय निवडला.
पण रोज मोलमजुरी करून पोट भरणारी ही महिला आपल्या कुटुंबासोबत छोट्याश्या झोपडीत राहते. त्यामुळे घरात लहान मुलगा असल्याने त्यांनाही आपल्यामुळे कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून या महिलेने भावाच्या रिक्षा टेम्पोमध्ये क्वारंटाईन होण्याचा निर्णय घेतला.
नातेवाईक एका लांब बांबूच्या मदतीने त्यांना रोज जेवण देतात. त्यात आता क्वारंटाईन असल्याने उत्पन्नाचा कुठलाही पर्याय उरला नाही. क्वारंटाईन होऊन त्यांना आज अकरा दिवस झाले असून, आणखी 14 दिवसानंतर त्या रिक्षा टेम्पोतून बाहेर येणार आहेत.