"चित्रा वाघ यांनी कुचिक यांच्यावर आरोप करण्यासाठी जीवेमारण्याची धमकी दिली" पिडीतेचा धक्कादायक खुलासा
X
राज्यभरात गाजत असलेलं रघुनाथ कुचिक प्रकरणाला आता एक वेगळंच वळण मिळालं आहे. या प्रकरणातील पिडीतेने आता थेट तिला मदत करणाऱ्या भआजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावरच धक्कादायक आरोप लावले आहेत. रघुनाथ कुचिक यांच्या विरोधात तक्रार दाखल करायला मला चित्रा वाघ यांनी भाग पाडलं त्यासाठी त्यांनी मला जिवे मारण्याची धमकी देखील दिली असे खळबळजनक आरोप पिडीतेने साम टीव्ही न्युजशी बोलताना केले.
शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पिडीत तरुणीनं तक्रार दाखल केली होती. लग्नाची खोटी आश्वासनं देऊन कुचिक यांनी शारीरिक संबंध ठेवल्याचे आरोप या तरूणीनं केले होतं. याशिवाय गरोदर राहिल्यानंतर जबरदस्तीनं गर्भपात करायला लावल्याचा आरोपही केला होता. त्यानंतर कुचिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण आता धक्कादायक वळणावर येऊन पोहोचलं आहे. या प्रकरणातील पीडितेनं साम टीव्हीवर खुलासा करताना म्हटलं आहे की, "मला गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीनं डांबून ठेवलं गेलं होतं. तसंच पोलिसांना विशिष्ट जबाब द्यायला आपल्याला चित्रा वाघ यांनी भाग पाडलं होतं. याशिवाय मी जर कुचिक यांच्याविरोधात तक्रार दाखल केली नाही तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला मारून टाकू", अशी धमकी दिल्याचे आरोप पिडीतेनं भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर लावले आहेत.
महम्मद अहमद अंकल उर्फ चाचा आणि चित्रा वाघ यांनी हे प्रकरण घडवून आणलं. तसंच चित्रा वाघ यांनी सादर केलेले मेसेजचे पुरावे खोटे आहेत. विशिष्ट यंत्रणेचा वापर करून माझ्या मोबाईलवरुन कुचिक यांना आणि कुचिक यांच्या मोबाईलवरुन मला मेसेज केले गेले आहेत, असंही या तरुणीनं सांगितलं. याशिवाय सोमवारी भाजपच्या पवार नामक एका व्यक्तीने एक पत्र आणून मला दिलं आहे. जे पोलिसांना देण्याची जबरदस्ती आपल्यावर करण्यात येत आहे, असंही ती म्हणाली. हे पत्र कुचिक यांनी दिल्याचं भासवण्यासाठी माझ्यावर भाजपकडून दबाव टाकला जात आहे, असा खळबळजनक आरोप या पीडित तरूणीने केला आहे.