पोलिसांची तत्परता...आणि समुद्रात बुडणाऱ्या दोन व्यक्तींना वाचवले
X
मुंबईत समुद्रात बुडणाऱ्या एक महिलेला आणि पुरुषाला यलो गेट पोलिस स्टेशनच्या पथकाने वाचवले. दोघेही पर्यटक होते आणि 'गेटवे ऑफ इंडिया'जवळ समुद्रात बुडत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास साळवी आणि निकिता दमानिया नावाच्या पर्यटकांची बोट जोराच्या प्रवाहामुळे दुसऱ्या बोटीला धडकली. यानंतर दोघेही खोल समुद्रात पडले. महिलेला पोहणे येत नसल्याने ती बुडू लागली. हा सर्व प्रकार लक्ष्यात येताच दक्षिण विभागीय पोलीस नियंत्रण कक्षाकडून बचावकार्यासाठी बोट पाठवण्यात आली. कोस्टल पोलिसांच्या बोटीने घटनास्थळी धाव घेत दोरीच्या सहाय्याने महिला त्यांच्या सोबत असलेल्या व्यक्तीचे प्राण वाचवले. दोघांना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्यांची प्राथमिक तपासणी केल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. या बचाव कार्यात एएसआय वसईकर, एएसआय मनोज पाटील, एएसआय जार्वेकर आणि पोलीस कॉन्स्टेबल बुंदिल यांचा सहभाग होता.
पालघरमध्ये देखील अशीच घटना घडली होती.
पालघरमधील वसई शहरातील रणगाव समुद्रकिनारी बोट उलटून एकाचा मृत्यू झाला होता, तर बोटीतील इतर पाच जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले होते. पोलीस अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, सहा जणांनी मौजमजेसाठी बेकायदेशीरपणे बोट भाड्याने घेतली आणि ते रणगाव बीचवर समुद्रात गेले होते, मात्र तिथे बोट उलटल्याने स्टीव्हन कौटिन्हो (३८) या गिरिजचा रहिवासी ठार झाला होता. स्थानिक लोकांच्या मदतीने पाच जणांची सुटका करण्यात आली होती.