बीड: अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणात पोलिसांचा हलगर्जीपणा; एमआयएमच्या आसमा शेख यांचा आरोप
X
बीडच्या माजलगाव मधल्या सुर्डी गावात एका अल्पवयीन मुलीवर गावातीलच एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक सुद्धा केली असून, त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयएम महिला प्रदेशाध्यक्षा आसमा शेख यांनी आज पिडीत कुटुंबाची भेट घेत, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
आसामा शेख या माध्यमांशी बोलताना म्हणाल्यात की, बीड येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना महराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारी आहे. तर पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचा या प्रकरणात हलगर्जीपणा पाहायला मिळाला असल्याचा आरोप आसमा यांनी केला आहे.
तर महाविकास आघाडीत मंत्री असलेले धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यातील ही घटना असताना त्यांना पिडीत कुटुंबाची साधी भेट घेण्यासाठी वेळ मिळत नसल्याची टीका सुद्धा आसमा शेख यांनी केली.
तसेच अत्याचार झालेल्या अल्पवयीन मुलीला न्याय न मिळाल्यास आपण उच्च न्यायालयात न्याय मागणार असून, आरोपी कोणत्याही समाजाचा असो आम्ही पिडीतीला न्याय मिळवून देण्यासाठी वेळ पडल्यास संघर्ष करू. तसेच या प्रकारामुळे पीडित कुटुंब भयभीत असून त्यांना सुरक्षा देण्याची मागणी सुद्धा आसमा शेख यांनी यावेळी केली.