स्टेजवर 'न्यूड डान्स'; ''आर आर पाटलांच्या स्वप्नाला तिलांजली'' चित्रा वाघ भडकल्या..
X
डान्स हंगामा कार्यक्रमाच्या नावाखाली स्टेजवर प्रेक्षकांच्या समोरच अत्यंत अश्लील कृत्य केली जात असल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरला झाला आहे. या प्रकरणामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील या सगळ्या प्रकारावरून महाविकास आघाडी सरकारवर संताप व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर आर पाटील यांचे स्वप्न होतं की डान्स बार बंद करून चुकीच्या मार्गानं जाणा-या तरूणाईला योग्य दिशा दाखवावी. पण आत्ता महाविकास आघाडीकडून आणि सत्तेतील राष्ट्रवादीकडून त्यांच्याच स्वप्नांना तिलांजली देण्याचा प्रकार नागपूर ग्रामीण भागांत घडला असल्याचं त्यांनी मॅक्सवुमनशी बोलताना म्हंटले आहे.
सरकारच्या नाकाखाली महिलांना नग्न अवस्थेत डान्स करायला लावला जातेय. ते ही उघडपणे. सरकारनं पोलिस यंत्रणेनं सर्व लाज शरम वेशीवर टांगलीय का ? असा प्रश उपस्थित करत त्यांनी सरकारसोबत पोलीस प्रशासनावर देखील टीका केली.
हे सर्व प्रकरण नक्की काय आहे...
सध्या जो व्हिडिओ व्हायरल होत आहे तो नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील बाम्हणी या गावातील असल्याचे सांगितले जात आहे. या भागातील काही गावांमध्ये डान्स हंगामाच्या नावाखाली अशा अश्लील नृत्यांचे कार्यक्रम सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. या गावामध्ये नुकताच हाच डान्स हंगाम कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. पण या कार्यक्रमात डान्स हंगामाच्या नावावर अश्लीलतेचा कळस पाहायला मिळाला.
या व्हिडिओमध्ये २ तरुण आणि तरुणी आपले कपडे काढून डान्स करताना दिसत आहे. दोन्ही तरुणी अंतर्वस्त्रांवर तर दोन्ही तरुण अर्धनग्न दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे ते तरुण या तरुणींना नग्न करतानाचे ही या दृश्यामध्ये दिसते आहे. एवढेच नाही तर स्टेजवरच प्रेक्षकांसमोर अश्लील चाळे करत असल्याचे देखील दिसते आहे. डान्स हंगामाच्या नावावर सुरू असलेल्या अश्लील नृत्याचा व्हिडिओ नागपूर जिल्ह्यात वेगाने व्हायरल झाला आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात हॉट हंगामा, इलेक्स जुली के हंगामे, सिम्पल हंगामे अशा नावांनी या डान्स हंगामा कार्यक्रमाचे आयोजन गावोवावी केले जात असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्याना हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या भागात आयोजित करण्यात आलेले असे काही कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचेही समजते आहे. या भागात संध्याकाळी सात नंतर असे कार्यक्रम सुरू होतात आणि रात्री उशिरापर्यंत ते सुरू असतात, अशीही माहिती काही माध्यमांनी दिली आहे. पण एवढ्या उघडपणे हे कार्यक्रम सुरू असतील तर पोलिसांना याची माहिती का मिळाली नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.