न्युज 18 लोकमत वृत्तवाहिनीला राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचा दणका..
X
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने न्यूज 18 लोकमत वृत्तवाहिनीला मोठा दणका दिला आहे. या वृत्तवाहिनीने Pregnancy Tips - मुलगा होण्याची लक्षणे नेमकी कोणती असतात? अशी एक बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीमुळे गर्भलिंग निदान करण्याबाबत जनसामान्यांमध्ये चुकीचे संकेत जाण्याची शक्यता असल्याचे म्हणत त्यांच्या अधिकृत वेब पेजवर प्रसिद्ध झालेली ही बातमी त्वरित काढण्याबाबत नोटीस पाठवली आहे. यापूर्वीही वारंवार न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिनीवर अशा प्रकारच्या अवैज्ञानिक बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. पुन्हा अशाच प्रकारे या वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध झालेल्या अवैज्ञानिक बातमीमुळे news 18 लोकमतला यावेळी मोठा दणका बसला आहे.
न्यूज 18 लोकमत या वृत्तवाहिनीच्या अधिकृत वेब पेजवरून 13 जुलै रोजी Pregnancy Tips मुलगा होण्याची लक्षणे नेमकी कोणती असतात? अशा आशयाची एक बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली होती. ही बातमी गर्भलिंग निदान करण्याबाबत जनसामान्यांमध्ये चुकीचे संकेत जाण्याची शक्यता आल्याचं म्हणत महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्षा सुशिबेन शाह यांनी संबंधित वृत्तवाहिनीला नोटीस पाठवत त्यांनी त्यांच्या वेब पेजवर प्रसिद्ध केलेली ही बातमी तत्काळ काढावी व आपला खुलासा आयोगाला त्वरित सादर करावा असे आदेश दिले आहेत. शाह यांनी न्यूज 18 लोकमतच्या संपादकांना पाठवलेल्या नोटीस मध्ये नक्की काय म्हटला आहे पाहूया..
News 18 Lokmat या फेसबुक पेज व वृत वाहिनीच्या अधिकृत वेबपेजवर दि. १३.०७.२०२२ रोजी Pregnancy Tips मुलगा होण्याची लक्षणे नेमकी कोणती असतात? अश्या आशयाची बातमी प्रसिध्द करण्यात आलेली आहे. या बातमीमुळे आपण गरोदर मातेस मुलगा होणार की मुलगी याबाबत एक प्रकारे बेकायदेशीर मार्गदर्शन करत आहात, असे दिसून येत आहे. सदर बातमीचे छायाचित्र पत्रासोबत पाठवण्यात येत आहे. अशा प्रकरची बातमी प्रसिध्द केल्यामुळे गर्भलिंग निदान याबाबत जनसामान्यांमध्ये चुकीचे संकेत जाण्याची शक्यता आहे. तसेच PCPNDT ACT 1994 नुसार कायद्याचे उल्लंघन करीत आहात. तरी या बातमीच्या अनुषंगाने आपण सदर मजकुर आपल्या फेसबुक पेज व वेबपेज वरून तात्काळ काढावा. तसेच आपला खुलासा आयोगास त्वरीत सादर करावा.