पवार साहेब ८० वर्षांचा तरुण तर तन्मय २५ वर्षांचा म्हातारा - रुपाली चाकणकर
X
सध्या सोशल मीडियावर काका-पुतण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. सगळं जग आमच्या साहेबांना "80 वर्षांचा तरुण" म्हणून ओळखतं, आणि तुम्ही तुमच्या तन्मय ला "25 वर्षांचा म्हातारा" म्हणून लस टोचतात. असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे. तसेच सोबत #चाचाविधायकहें_हमारे #TanmayFadnavis असा हॅशटॅगही पोस्ट केला आहे.
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या 25 वर्षाच्या पुतण्याला लस देण्यात आल्यानं सध्या फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे. देवेंद्र फडणवीस यांचा पुतण्या तन्मय फडणवीस याने नागपूरच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये (NCI) लसीचा दुसरा डोस घेतानाचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. त्यानंतर मोठी टीका करण्यात आली. त्यानंतर हा फोटो डिलीटही करण्यात आला आहे.
मात्र विरोधी पक्षाने यावरून भाजप आणि फडणवीस यांच्यावर हल्ला चढवत, भाजप नेत्यांच्या कुटुंबीयांचा जीव महत्त्वाचा मग इतर लोक काय किडेमुंग्या आहेत का? त्यांच्या जिवाची काहीच किंमत नाही का?असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे पुतण्यावरील आरोपावरून फडणवीस काका अडचणीत सापडले आहे.
फडणवीसांचा खुलासा!
तन्मय फडणवीस माझा दूरचा नातेवाईक आहे. त्याला कोणत्या निकषानुसार लसीचा डोस मिळाला याची मला कल्पना नाही. जर हे नियमानुसार झालं असेल तर त्याच्यावर आक्षेप घेण्याचं कारण नाही. पण जर नियमावलीचं उल्लंघन झालं तर हे अगदी अयोग्य आहे. पात्र नसल्याने माझ्या पत्नी आणि मुलीलाही लस मिळालेली नाही. प्रत्येकाने नियमांचं पालन केलं पाहिजे हे माझं ठाम मत आहे. असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं आहे.