गडकरींच भाषण अजून दरेकरांपर्यंत पोहचलेलं दिसत नाही; चाकणकरांची खोचक टीका
प्रवीण दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने एवढं पछाडलं आहे की, त्यांना काय आरोप करावे याचं सुद्धा भान राहिलेलं नाहीये.
X
मुंबई: देशात कोरोना परिस्थिती गंभीर होत असताना राजकीय आरोप-प्रत्यारोप काही थांबायला तयार नाहीत. लसीकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर टीका करणारे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत समाचार घेतला आहे.
केंद्राने मुबलक साठा पाठवून सुद्धा ठाकरे सरकार लसींचा जाणुनबुजून तुटवडा निर्माण करत असून,मुंबईत लसीचं ढिसाळ नियोजन होत असल्याचा आरोप दरेकर यांनी केला होता.

त्यांच्या याच आरोपाला उत्तर देत चाकणकर म्हणाल्यात की, एकीकडे मोदीजी महाराष्ट्राचं कौतुक करत आहे,नीती आयोगाच्या अध्यक्षांनी देशभरात यशस्वी ठरत असलेल्या मुंबई मॉडेलचं कौतुक केलं आहे,तर दुसरीकडे प्रवीण दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने एवढं पछाडलं आहे की, त्यांना काय आरोप करावे याचं सुद्धा भान राहिलेलं नाहीये,असा टोला चाकणकर यांनी लगावला.

अशी वक्तव्य करून तुम्ही सन्माननीय पंतप्रधान मोदीजींचा अपमान करताय.नितीनजी गडकरींनी कालच्या एका भाषणात अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे, ते भाषण अजून तुमच्यापर्यंत आलेले दिसत नाही, वाटल्यास त्याची लिंक आम्ही तुम्हाला देऊ शकतो,असं म्हणत चाकणकरांनी दरेकर यांना खोचक टोला लगावला आहे.
